
नालेसफाईत महापालिका काठावर पास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महापालिकेवर नालेसफाईच्या निमित्ताने आमदार आशीष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. नालेसफाईच्या कामामध्ये मुंबई महापालिका काठावर पास झाल्याची टीका त्यांनी केली. या कारभाराला सत्ताधारी शिवसेना आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील अनेक भागांत नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
मुंबईत आपत्कालीन परिस्थितीला सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे कोणताही आपत्कालीन आराखडा नसल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी केलेला मुंबई तुंबण्याचा दावा हा जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आदित्य यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.
आज मुंबई महापालिका आयुक्तांना त्यांनी २० नाल्यांच्या कामाचे पाहणी दौऱ्याचे फोटो दिले. महापालिकेच्या वेबसाईटवर नालेसफाईचे झळकणारे आकडे म्हणजे जुगाराचे, सट्टेबाजांचे, कंत्राटदारांचे आकडे असल्याचा आरोप आशीष शेलार यांनी केला. या आकडेवारीचा वास्तवाशी संबंध नाही. आम्ही मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कालपासून पळापळ सुरू केली. आम्ही नालेसफाईच्या भागाचा दौरा करणार असल्याचे लक्षात येताच आदित्य ठाकरे हे रात्रीच्या वेळेतच नालेसफाईचे काम पाहायला पोहचले, पण रात्रीच्या काळोखात म्हणजे अंधारात कोणते काम होते? असा प्रश्न करत अंधारातील हे सर्वस्वी पाप शिवसेनेचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील रस्त्यावर पाणी साचणारच, हा दावा म्हणजे जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत यंदा पाणी तुंबले तर त्याला शिवसेना जबाबदार असेल. त्यामुळे शिवसेनेने मुंबईकरांची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मुंबईकरांकडे शिवसेनेचे कोणतेही लक्ष नाही. तसेच मुंबईकरांना असुरक्षित करण्याचे काम सुरू असल्याचेही शेलार म्हणाले. पण भाजप मात्र या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. मुंबईचे सेवक म्हणून भाजप काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी ठिकठिकाणी नाल्यांवर पोहोचून नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्याचे ते म्हणाले.
...
कोळी बांधवांसाठी वेळ नाही!
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांना वेळ नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर आदित्य ठाकरे काय सूचना ऐकणार, असेही शेलार म्हणाले.
...
मग छाटणी कधी?
पालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, वृक्षछाटणीबाबत पालिका आता उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. जर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षछाटणीचे प्रशिक्षण होणार असेल तर मग छाटणी कधी करणार, असा सवाल आमदार आशीष शेलार यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82888 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..