बीकेसी कोविड केंद्राला दोन वर्ष पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीकेसी कोविड केंद्राला दोन वर्ष पूर्ण
बीकेसी कोविड केंद्राला दोन वर्ष पूर्ण

बीकेसी कोविड केंद्राला दोन वर्ष पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : बीकेसी कोविड केंद्राला १९ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्धापनदिनानिमित्त कोविडच्या युद्धात दिलेल्या सेवेबद्दल बीकेसी केंद्र आणि पालिकेतर्फे कोविड योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र व तुळशीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय जम्बो कोविड केंद्राविषयी डाक्युमेंट्रीचे उद्घाटनही करण्यात आले.

बीकेसी कोविड केंद्राने दोन वर्षांच्या कोरोना महामारीत २९ हजार रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. त्यातील २५ हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. यासह कमीत कमी मृत्युदर ठेवण्यावर बीकेसी कोविड केंद्राने भर दिला होता. तसेच एकूण २,५०० रुग्णांना डायलिसीसची सुविधा दिली गेली. आतापर्यंत एकूण ५ लाख लशीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांचा कालावधी आव्हानात्मक होता. आता बीकेसी कोविड केंद्रांत एकही रुग्ण नाही. बीकेसीत जवळपास १२ टक्के रुग्ण मुंबईच्या बाहेरील होते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, पोलादपूर, नाशिक, उस्मानाबाद येथून दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण दाखल झाले होते.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या नर्सिंग स्टाफलाही सन्मनित करण्यात आले. त्यापैकी कल्याणला राहणाऱ्या नानावटी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या संगीता लाल यांनी कोविड वॉर्ड तयार झाल्यापासून ते लसीकरणापर्यंत सेवा दिली. कुटुंबीयांची काळजी घेत आम्ही कोविड सेवा केली. कुटुंबीय बाधित झाले; पण आम्हाला अजूनही कोविड झालेला नाही. चेंबूरला राहणाऱ्या रिंकू बनसोडे या सुराणा रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. रिंकू यांच्या काकीचा कोविडने मृत्यू झाला. केईएममध्ये दाखल असलेल्या काकीचा मृतदेह स्वतःच्या हाताने बांधताना रिंकूचे हात कापत होते. हा एक वाईट अनुभव कायम लक्षात राहणार असल्याचे ही रिंकू यांनी सांगितले; पण आज आमच्या कामाची दखल घेतल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला.