माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा
माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा

sakal_logo
By

भाईंदर, ता.१९ (बातमीदार) : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहता यांच्या विरोधात सर्व ज्ञात स्रोतातून मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकांकडून मेहतांच्या घर व कार्यालयात तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती जमविल्याप्रकरणी २०१६ मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १९) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ही चौकशी सुरू होती. एसीबी पथकाची ही चौकशी पूर्ण झाली असून याप्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहतांवर नवघर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. ठाणे लाचलुचपत विभागाच्या दोन पथकाकडून मेहतांच्या घर व कार्यालयावर धाड टाकण्यात आली. हे सर्च ऑपेरशन गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होते; परंतु त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले का, याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, जानेवारी २००६ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत नगरसेवक व आमदार असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग करून मेहता यांनी उत्पन्नापेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये इतक्या रकमेची असंपदा जमवल्याचे एसीबीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

नरेंद्र मेहता हे सर्वप्रथम २००२ मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७ मध्ये ते महापौरपदी विराजमान झाले. २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यात ते थोड्या फरकाने पराभूत झाले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी विजय मिळवून ते आमदार झाले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला.