
सहायक पोलिस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ ः उसाटणे गावातील एका कंपनीत अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कंपनीने कामगार सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी हिललाईन पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक धनंजय गणगे यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती नेवाळी चौकी येथे २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गणगे यांना गुरुवारी (ता.१९) रंगेहाथ अटक केली आहे.
हिललाईन पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी चौकीत पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गणगे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. दाखल तक्रारीवरून गुरुवारी नेवाळी चौकीत सापळा रचला गेला. गणगे यांनी तक्रारदार यांच्याकडून २० हजार स्वीकारताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या. याचा अधिक तपास लाचलुचपत विभाग करत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82922 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..