माजी नगरसेवक अरुण जाधव यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी नगरसेवक अरुण जाधव यांना अटक
माजी नगरसेवक अरुण जाधव यांना अटक

माजी नगरसेवक अरुण जाधव यांना अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १९ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अरुण हरिश्चंद्र जाधव यांना नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आली आहे. सिडकोच्या बांधकाम परवानगीत हेराफेरी करून, इमारत बांधून ती ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सन २०२० मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जामीन मिळवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात प्रयत्न केले होते; पण जामीन न मिळाल्याने बुधवारी (ता. १८) त्यांच्या राहत्या घरातून तुलिंज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आज वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अरुण जाधव बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहेत. दत्तनगर परिसरात पार्वती धाम नावाची तीन मजली इमारत बांधली होती. ही इमारत बांधतांना त्यांनी सिडकोच्या बांधकाम परवानगीत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इमारतीतील सदनिका ग्राहकांना विकून ग्राहक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सन २०२० मध्ये वसई-विरार महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी तुलिंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अरुण जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या कुटुंबीयांची जमीन हडप केली. त्यावर इमारत बांधली होती, हे आम्हाला समजल्यावर आम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना जाधव यांनी अनेक ठिकाणी असे फ्रॉड केले असल्याचे समोर आले. त्यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे दाखल आहेत. या अगोदर एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्यांनी अनेक फ्रॉड केले असून पोलिसांनी सर्व गुन्ह्यांचा योग्य तपास करावा, अशी मागणी तक्रारदार कुमार काकडे यांनी केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे हे पुढील तपास करत आहेत.