
सत्ताधाऱ्यांकडून विकसकांना कोट्यवधीचा फायदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : प्रकल्पबाधितांच्या घर उभारणी प्रकल्पाचे काम विकसकांना देताना सत्ताधाऱ्यांनी जवळपास १० हजार कोटींचा विकसकांचा फायदा करून दिल्याचा आरोप काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेच्या या कारभाराची चौकशी व्हावी म्हणून लोक आयुक्त, दक्षता विभाग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, पालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.
भांडुप (पश्चिम), माहीम, मुलुंड (पूर्व), चांदिवली येथील भूखंडावर प्रकल्पबाधितांसाठीची १४ हजार ५०० घरे विकसित करण्यासाठी ते काम विकसकांना देताना हा फायदा मिळवून दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत क्रेडिट नोट बेनिफीट देताना ५,६०२ कोटी मंजूर करण्यात आले; तर टीडीआर बेनिफिट हे १०.२७ कोटी इतके मंजूर करण्यात आले. कंस्ट्रक्शन टीडीआर बेनिफिट १,५५० कोटी मंजूर करण्यात आले. चारही प्रकल्पांतर्गत विकसकांना ९,३८० कोटींचा नफा मिळवून दिल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
जी दक्षिण विभागाअंतर्गत ३,३१७ चौरस मीटरचा भूखंड आहे. क्लासिक प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकासाचे काम देण्यात आले. येथे ६८०.९१ कोटींचा विकसकांचा फायदा होईल, असे अपेक्षित आहे. टी वॉर्ड अंतर्गत मुलुंडच्या स्वास कंस्ट्रक्शनला ५२,६३२ चौरस फुटाचा भूखंड विकासासाठी दिला गेला आहे. येथे विकसकाला ४,११४ कोटींचा फायदा होईल. एस वॉर्डअंतर्गत भांडुप येथे १९०३ प्रकल्पबाधित आहेत. येथे न्यू वर्ल्ड लॅंडमार्कला १,०५६ कोटी फायदा करून देण्यात आला आहे. एल वॉर्डअंतर्गत चांदिवली येथे २३,४०५ चौरस फुटाचा भूखंड आहे. येथे २,१२३ कोटींचा फायदा विकसकांना होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला.
विषय घाईघाईने मंजूर!
इम्प्रुव्हमेंट कमिटीच्या अध्यक्षांनी पीएपीए प्रकल्पाचा विकास करण्याचा प्रस्ताव हा घाईने मंजूर केला. त्यानंतर मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय आल्यानंतर या प्रस्तावाला आम्ही विरोध केला होता; पण महापौरांनीही व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा विषय घाईघाईने मंजूर केल्याचा आरोप हा रवी राजा यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82927 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..