
३१ मे पूर्वी नालेसफाईचे आदेश
कल्याण, ता. १९ (बातमीदार) ः या वर्षी नालेसफाईच्या कामाला लवकर सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ही पूर्ण कामे ३१ मेपूर्वी करण्याचे आदेश दिल्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ९५ कि.मी. लांबीचे ९७ महत्त्वाचे नाले आहेत. त्यांच्या सफाईचे काम पावासाळ्यापूर्वी सुरू झाले आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज (ता. १९) अधिकाऱ्यांसमवेत कल्याण पश्चिममधील संतोषी माता रोड, सांगळे वाडी स्मशानभूमी, कल्याण पूर्वमधील लोकग्राम पुना लिंक रोड, खडे गोळवळी नाला, डोंबिवलीमधील खंबाळपाडा नाला, नांदिवली पुलाजवळील नाला आदींची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना पालिका आयुक्त म्हणाले की, दर वर्षी आपण पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करत असतो. या वर्षी कामाला लवकर सुरुवात केली आहे. पालिका क्षेत्रात ९७.५ किलोमीटर लांबीचे ९५ मोठे नाले आहेत. आज ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ३१ मेपूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.