
पोलिसांमुळे नवी मुंबईत गुन्हेगारी वाढली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ ः नवी मुंबई पोलिस आयपीएल मॅच पाहण्यात दंग असून शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला नवी मुंबई पोलिस आयुक्त जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. शहरात मटका, लॉटरी, जुगार, गोमांस तस्करी, अवैध दारूविक्री, डिझेलचोरी, गुटखाविक्री, रात्री २ वाजेपर्यंत बार व पब सुरू ठेवणे, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री, जेएनपीटीतील लालचंदन तस्करी यांसारखे धंदे राजरोसपणे केले जात असल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी आज पत्रकार परषदेत केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिल्याचे सांगितले.
म्हात्रे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेत नवी मंबई पोलिसांवर आगपाखड केली. आयपीएल मॅचेसना परवानगी देताना वाहतूक विभागाने नियोजन करणे गरजेचे असते; पण पोलिस अधिकारी आयपीएल मॅचेसमध्ये गुंतलेले दिसतात. हे शोभनीय नाही, असा शेरा म्हात्रे यांनी मारला. वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका मी सातत्याने पाहिल्या असून त्यांनाही वाट मिळत नाही. नवी मुंबईतील सर्वच पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचारीवर्ग आयपीएल मॅचकरिता कामाला लागल्याने सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यास त्यांना वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आयपीएल मॅचकरिता लागणारी परवानगी स्थानिक नागरिकांचा विचार न करता त्वरित देण्यात येतात; परंतु सामान्य नागरिकांनी एखादी परवानगी मागितली की, त्यांना सातत्याने फेऱ्या माराव्या लागतात. तसेच कार्यालयाबाहेर सातत्याने वाट पाहण्यास भाग पाडले जाते, असे सांगत म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला.
-------------------------------------------
एनएमएसएमधून पोलिस हप्ते घेतात
वाशी येथील एन.एम.एस.ए. येथे पोलिसांच्या कोणत्या बैठका होतात, याची चौकशी करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. शहरात करोडो रुपयांचा गैरव्यवहार होत असताना सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे कामही पोलिस विभाग करीत आहे. पोलिसांच्या सर्वच विभागात मनमानी कारभार सुरू असून याची दखल घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आज पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
नवी मुंबई दलात एक वझे?
नवी मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर, हायवेवर रसायनांनी भरलेल्या सुमारे ५००० गाड्या अनधिकृतपणे पार्किंगच्या नावाखाली उभ्या असतात. वाहतूक पोलिस विभाग या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पोलिस एका गाडीमागे २०० रुपये घेत असल्याचेही काही नागरिक खासगीत बोलत आहेत. नवी मुंबईमध्येही वझेसारखे अधिकारी आहेत का, असा सवालही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये आधीच ट्राफिकची समस्या वाढत असताना नवी मुंबईत सुरू असलेल्या आयपीएल मॅचमुळे होणाऱ्या ट्राफिकमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.