
संपूर्ण जग महागाईच्या कचाट्यात; भारत, ब्रिटन, अमेरिकेसह पाकमधील नागरिकही बेजार
मुंबई : संपूर्ण जगाला महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. भारतातही एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्चमध्ये हा दर ६.९५ टक्क्यांवर होता. सततच्या महागाईवर उपाय म्हणून आरबीआयने रेपो दरात वाढही केली आहे; परंतु महागाईशी सामना करणाऱ्या देशात केवळ भारतच नाही तर ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, पाकिस्तान यासह अन्य अनेक देश महागाईच्या भस्मासुराचा सामना करत आहेत. भारतीयांप्रमाणे जगभरातील नागरिकही महागाईच्या कचाट्यात अडकले आहेत.
ब्रिटनमध्ये १९८२ नंतरची सर्वाधिक महागाई
- ब्रिटनमध्ये एप्रिलमधील किरकोळ महागाई दर ९ टक्क्यांवर पोहोचला आहे. १९८२ नंतर सर्वाधिक महागाईचा सामना तेथील नागरिकांना करावा लागत आहे.
- इंग्लंडमध्ये महागाईचे कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी आली आहे. ब्रिटनमध्ये किरकोळ वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
- युरोपातील अन्य देशांचा विचार केला तर स्पेनमध्ये किरकोळ महागाई दर ८.४ टक्के, जर्मनीत ७.४ टक्के आहे. जर्मनीमध्ये १९८१ नंतरची ही सर्वाधिक महागाई असल्याचे बोलले जाते.
अमेरिकेत महागाई ४० वर्षांच्या उच्चांकीवर
- जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेलाही महागाईच्या भडक्याने कवेत घेतले आहे. अमेरिकेत एप्रिलमधील महागाई दर ८.३ टक्क्यांवर होता.
- मार्चमध्ये हा दर ८.५ टक्के इतक्या उच्चांकीवर पोहोचला. त्यामुळे येथील महागाई ४० वर्षांच्या उच्चांकीवर पोहोचली आहे. अमेरिकेत अन्नधान्याच्या किमतींपासून विमान तिकीट, वाहनांच्या किमतीही वधारल्या आहेत.
- अमेरिकेत एप्रिलमध्ये विमानसेवा १९ टक्क्यांनी महागली आहे. मागील तीन महिन्यांत विमानाच्या तिकिटात ३५ टक्के वाढ झाली आहे.
- मार्चच्या तुलनेत येथे एप्रिलमध्ये गॅसचे दर ६ टक्के घटले आहेत, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत ते अधिकच आहेत.
शेजारील पाकही महागाईने हैराण
शेजारील पाकिस्तानातही महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. पाकिस्तानात एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर १३.४ टक्के इतक्या मोठ्या उच्चांकीवर पोहोचला आहे. भारतातील एप्रिलमधील किरकोळ महागाई दराच्या तुलनेत हा फारच जास्त आहे. मार्चमध्ये पाकमध्ये हा दर १२.७ टक्क्यांवर होता. याचा अर्थ अन्य देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये सर्वाधिक महागाई आहे. पाकमध्ये इंधनासह किरकोळ दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82965 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..