
खतांसह कीटकांच्या किमतीत वाढ
पेण, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्रातील जनता दोन-तीन वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करीत असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भातशेतीला लागणाऱ्या खतांसह सर्व प्रकारचे कीटक-तणनाशकांच्या किमती भरमसाट वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या काही दिवसांपासून खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. मात्र रासायनिक खत, कीटकनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पेणमधील शेतकरी खत, कीटकनाशके खरेदी करावी की नाही, याचा विचार करीत आहेत.
पेण तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात खत, औषधे, तणनाशकेही लागतात; परंतु भातशेतीच्या उत्पादनापेक्षा खर्च मोठा होत आहे. मजुरीही वाढली असून अनेकदा मजुरांअभावी भात लावणी, कापणीस विलंब होतो. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यापुढे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वर्षभरापासून रासायनिक खतांच्या किमतींमध्ये सतत वाढ सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा अप्रत्यक्ष फटका भारताला बसला असून देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर जवळपास दुप्पट वाढले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने सध्या शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र पेरणीनंतर लागणाऱ्या खतांची भाववाढ पाहता शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरीप हंगामातील उत्पादनावर कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठीही औषध फवारणी महत्त्वाची आहेत.
शेतकरी बाराही महिने तीन हंगामात वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो. मात्र खतांच्या, कीटकनाशक, तणनाशकांच्या किमती वाढल्याने शेतीतील खर्च वाढतच आहे. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन किमती कमी कराव्यात, अन्यथा शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडेल.
- शरद जाधव, प्रगतशील शेतकरी, पेण
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तालुक्यात १० हजार हेक्टरच्या वर भातशेती होते. शेतीला लागणाऱ्या सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खत, कीटकनाशक, बियाणे, अवजारे ही योग्यरीत्या पडताळणी करूनच घ्यावीत.
- अनिल रोकडे, कृषी अधिकारी, पेण
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83029 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..