नवी मुंबई शहरातील दिव्यांगांचे स्वप्न पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navi-mumbai-municipal
दिव्यांगांचे स्वप्न पूर्ण होणार

नवी मुंबई शहरातील दिव्यांगांचे स्वप्न पूर्ण होणार

नवी मुंबई - शहरातील अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. मागील कित्येक वर्षे भूखंडाअभावी रखडलेल्या स्टॉलच्या वाटपाला गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. अपंगांना स्टॉलचे वाटप करण्यासाठी सिडकोकडून १४ भूखंड हस्तांतरित करण्यात आले आहेत.

अपंगांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. वाशी येथील महानगरपालिकेचे ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र हे एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देणारे देशातील अग्रगण्य केंद्र आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. १४ भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झालेली आहे. या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन दिव्यांग व्यक्तींना लवकरात लवकर स्टॉल उपलब्ध करून देण्याकरिता अभिजित बांगर यांनी मालमत्ता विभागाची बैठक घेतली होती. आगामी एक महिन्याच्या कालावधीत याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, असे आदेश दिले.

स्थापत्य विभागानेही त्यानुसार सिडकोने हस्तांतरित केलेल्या भूखंडांच्या वापरासाठी योग्य प्रकारे विकास करण्याची कामे समांतरपणे एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. स्टॉलची निर्मिती करतानाही दिव्यांगांच्या दृष्टीने विचार करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही बांगर यांनी निर्देश दिले. आगामी एक महिन्यात सदर भूखंडांचा वापरण्यायोग्य विकास करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देतानाच आयुक्तांनी स्टॉल निर्मिती व दिव्यांग सूचीबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मालमत्ता विभागास दिले.

स्टॉलमध्ये ये-जा करण्यासाठी व्यवस्था

स्टॉलमध्ये दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था योग्य रीतीने असावी, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे या कामासाठी भूखंड विकसित करताना तेथे आवश्यक सुविधांची पूर्तता करावी आणि दिव्यांगांना वापर करणे सुलभ होईल, अशा प्रकारे प्रसाधनगृहांची व्यवस्था असण्याची काळजी घेण्यात यावी, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. सदर १४ भूखंडांची पाहणी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत करावी, असे सूचित केले. आयुक्तांनी काही भूखंडांना मालमत्ता विभागाचे उपायुक्त आणि शहर अभियंता यांनीही संयुक्तपणे भेट देऊन पाहणी करावी, असे निर्देशित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83046 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..