नवी मुंबई : पामबीच मार्ग हिरवेगार होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

palm beach road mumbai
पामबीच मार्ग हिरवेगार होणार

नवी मुंबई : पामबीच मार्ग हिरवेगार होणार

नवी मुंबई - नवी मुंबई शहर हे सिडकोने केलेल्या उत्तम स्थापत्यकलेच्या नियोजनातून साकारलेले शहर आहे. या शहरातील काही वास्तू आणि जागांचे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. पामबीच मार्ग हा त्यापैकी एक असून लवकरच या मार्गाला हिरवाईची शाल पांघरली जाणार आहे. पामबीच मार्गावरील वृक्षसंपदेत काही नव्या वृक्षांची भर पडणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे पामबीच मार्गावर मियावाकी पद्धतीने अडीच हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. याआधीच पामबीच मार्गावर नेरूळ येथे अडीच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

बेलापूर ते वाशीच्या कोपरी गावापर्यंतचा पामबीच मार्ग हा नवी मुंबईतील सर्वात वेगवान मार्ग म्हणून ओळखला जातो. विस्तृत आणि दुतर्फा वृक्ष संपदा असल्याने या मार्गावर वाहन चालवताना वाहन चालकांना अल्हाददायक दृश्य दिसते. रस्त्याच्या एका बाजूला खाडी किनारा असल्यामुळे कांदळवनांचे घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला वसाहतींच्या इमारती दिसतात. काही वर्षांपूर्वी पामबीच मार्गावर इमारतींच्या शेजारी लावण्यात आलेली झाडे आता वाढल्याने त्या दिशेलाही बऱ्यापैकी हिरवळ तयार झाली आहे. मात्र काही भागात अजूनही पामबीचचा भाग मोकळा आहे. हे भाग ओळखून त्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय वृक्षप्राधिकरण समितीतर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार पामबीच मार्गावर नेरुळ येथे अडीच हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. या झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड केली जाणार आहे.

एका त्रयस्थ संस्थेमार्फत ही वृक्ष लागवड केली जात असून त्यांचे संगोपनाचा खर्च ही सदरच्या संस्थेमार्फत केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला जागा उपलब्ध करून देण्यापलीकडे आणि पाणी पुरवठा करण्याचा खर्चाऐवजी दुसरा खर्च होणार नाही. त्याच धर्तीवर महापालिका मुख्यलयाशेजारी सीवुड्‌स सेक्टर ५० येथील मलनिस्सारण केंद्राच्या शेजारील मोकळ्या जागेवर अडीच हजार वृक्षारोपण केले जाणार आहे. मियावाकी पद्धतीने या वृक्षांची लागवड करून मुख्यालयाशेजारी घनदाट जंगल उभारायचे प्रशासनाचे नियोजन आहे. या हरित पट्ट्यांना शेजारच्या मलनिस्सारण केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नव्या वृक्षारोपणावर पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे.

सुवासिक मार्गाचा प्रस्ताव बारगळला

नवी मुंबईचे ‘क्विन नेकलेस’ म्हणून प्रसिद्ध असणारा पामबीच मार्गावर सुवासिक आणि रंगीबेरंगी फुलांची रोपे लावण्यात येणार होती. अगदी वाशी ते बेलापूर दरम्यान सुवासिक आणि रंगीत फुलांची लागवड केली जाणार होती. उदा. सानपाडा ते नेरूळ, नेरूळ ते सीवुड्स, सीवुड्स ते बेलापूर अशी पामबीच मार्गावरील शहरांची ओळख देणारी ही फुले होती. तत्कालीन आयुक्त एन. रामास्वामी यांच्या काळात पूर्वीचे उपायुक्त नितीन काळे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यांच्यानंतर या प्रस्तावावर काहीच कार्यवाही झाल्याने हा प्रस्ताव बारगळला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83048 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..