ई-दुचाकींमधील फेरबदल परिवहन विभागाच्या रडारवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric bike
ई-दुचाकींमधील फेरबदल परिवहन विभागाच्या रडारवर!

ई-दुचाकींमधील फेरबदल परिवहन विभागाच्या रडारवर!

मुंबई - वाहन उत्पादक आणि वितरकांसह काही नागरिकही विजेवरील दुचाकींमध्ये बेकायदा बदल करून त्या रस्त्यावर चालवत आहेत. परिणामी दुचाकींना आग लागण्याचे प्रकार वाढू लागले असून राज्याच्या परिवहन विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. ई-बाईकमध्ये फेरबदल करणाऱ्या उत्पादक आणि वितरकांविरुद्ध राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दोषी वाहन उत्पादक, वितरक आणि मालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या सूचनाही सर्व प्रादेशिक व उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार २५० वॉटपेक्षा कमी क्षमता असलेल्या आणि ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी वेगमर्यादा असलेल्या ई-दुचाकींना नोंदणीपासून १०० टक्के सूट देण्यात आली आहे. उत्पादकास वाहन प्रकाराची चाचणी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ९२६ मध्ये असलेल्या एआरएआय, आयसीएटी आणि सीआयआरटी मान्यताप्राप्त संस्थांकडून करून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतरच आरटीओ कार्यालय ई-वाहनांना नोंदणीतून सूट देते; मात्र नियमांचे उल्लंघन करून २५० वॉटपेक्षाही जास्त क्षमतेच्या बॅटरी ई-दुचाकीमध्ये सर्रास वापरल्या जात आहेत. परिणामी त्यांना आग लागून अपघात होत असल्याचे निरीक्षण राज्य परिवहन विभागाने नोंदवले आहे. विजेवरील वाहनांमध्ये कोणताही अनधिकृत बदल करू नये, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

६६,४८२ ई-दुचाकींची नोंद

राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार विजेवरील दुचाकी आणि इतर वाहनांना मोटार करातून धोरण कालावधीसाठी १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ६६ हजार ४८२ ई-दुचाकींची नोंदणी झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83053 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..