वृक्षतोडीच्या वादात गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षतोडीच्या वादात गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची उडी
वृक्षतोडीच्या वादात गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची उडी

वृक्षतोडीच्या वादात गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची उडी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : वाशीतील ३९० झाडांवर महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या कुऱ्हाडीवरून गेले काही दिवस नवी मुंबई शहरात वादंग निर्माण झाला आहे. या वादात अखेर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या माजी पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड यांनी या वृक्षतोडीला प्रखर विरोध केला आहे. याप्रकरणी आपण पाठीशी आहोत, असे सांगून संबंधित नगरसेविकेशी संपर्क करून रविवारी पाहणी दौरा करणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेतर्फे पामबीच मार्गावर वाशीत महात्मा फुले चौक ते कोपरी गावापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या आड येणाऱ्या ३९० झाडांवर पालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे. यापैकी काही झाडे स्थलांतरित होणार आहेत; तर काही झाडे कायमस्वरूपी तोडली जाणार आहेत. त्याकरिता वृक्षप्राधिकरण समितीने हरकती व सूचना घेण्यासाठी दिलेल्या जाहिरातीत १८ मेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीची कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांना माहिती न मिळाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधींनी संशय व्यक्त केला. या प्रकल्पात एवढ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने राष्ट्रवादीतर्फे दिव्या गायकवाड आणि माजी आरोग्य सभापती विक्रम शिंदे या दोघांनी विरोध दर्शवला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लोकप्रतिनिधींच्या विनंतीला मान देत वृक्षतोडीवर हरकती व सूचना घेण्यास २० जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
प्रकरणाला वेगळे वळण मिळणार
पुलाचे काम ठाण्यातील शिवसेनेच्या एका नेत्याच्या नातेवाईकाला देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे एवढा खटाटोप सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आव्हाडांनी या प्रकरणात उडी घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे. उद्या (ता. २२) दुपारच्या सुमारास आव्हाड वाशी येथे येऊन प्रत्यक्ष झाडांची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व वृक्षप्रेमींसोबत संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83058 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..