निविदा प्रक्रियेअभावी ‘मल्टिस्पेशलिटी’ची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निविदा प्रक्रियेअभावी ‘मल्टिस्पेशलिटी’ची रखडपट्टी
निविदा प्रक्रियेअभावी ‘मल्टिस्पेशलिटी’ची रखडपट्टी

निविदा प्रक्रियेअभावी ‘मल्टिस्पेशलिटी’ची रखडपट्टी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २२ : ठाणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, तसेच रुग्णांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे (सिव्हिल) मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येत आहे. त्यानुसार ९०० खाटांच्या या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगती कारभारामुळे अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याने सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम रखडले आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यावेळी सरकारने ३१४ कोटींचा निधी दिला आहे. त्यानंतर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याला सरकारने परवानगी देत ५७४ खाटा रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचे ठरले होते, मात्र भविष्यातील वाढते नागरीकरण व विस्तारीकरणामुळे रुग्णालयात खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त होते. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने विचार करून वास्तू उभी राहण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवा प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ९०० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामासाठी अखेर ५२७ कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, परंतु या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. निविदा काढण्याचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे रुग्णालय उभारणीचे काम रखडल्याचे चित्र आहे. या निविदा कधी निघणार आणि ठेकेदार निश्चित होऊन प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

खाटांचे नियोजन
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी ९०० खाटांच्या नवीन प्रस्तावामध्ये २०० खाटा सुपरस्पेशालिटी, २०० खाटा लहान मुले, प्रसूती, महिला आणि ५०० खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी ठेवण्याचे सुचविले होते. यात सर्वसामान्य खाटांमध्ये हाड, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, आयसीयू नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे.

रुग्णालय उभारणीला तांत्रिक मान्यता अद्याप मिळाली नाही. येत्या काही दिवसांत मान्यता मिळाल्यास तात्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- सुनील पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83098 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top