
वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून वृद्धाला गंडा
नवी मुंबई : विजेचे बिल अपडेट न झाल्याने घरातील पुरवठा बंद केला जाणार असल्याची भीती दाखवून एका सायबर चोरट्याने वृद्ध दाम्पत्याला खात्यातून तब्बल पावणेचार लाख रुपये परस्पर लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी या सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उलवे, सेक्टर-२१ मध्ये रमेश पाटील (वय ६८) हे पत्नी रुता (६४) यांच्यासह राहतात. पाटील दाम्पत्य सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम ठेवली आहे. ते याच बँक खात्याचा इंटरनेट बँकिंगसाठी वापर करत होते. १७ मे रोजी एका सायबर चोरट्याने रमेश यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांच्या घराच्या विजेचे बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची भीती दाखवून त्यांना तत्काळ संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर पाठवून दिला. त्यामुळे पाटील यांनी सदर नंबरवर कॉल केला असता, त्यांचे वीजबिल अपडेट न झाल्याचे सांगितले.
त्यासाठी मोबाईलवर टीम व्ह्युवर क्विक सपोर्ट नावाचे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे शंभर रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी ॲप डाऊनलोड केल्यावर आयडीची माहिती सायबर चोरट्याला दिली. त्यानंतर पाटील यांनी पत्नीच्या बँक खात्यातून १०० रुपयांचे बिल भरले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून पैसे जात असल्याचे मेसेजेस त्यांच्या मोबाईलवर आले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून बँक खाते ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत सायबर चोरट्याने त्यांच्या खात्यातून पावणेचार लाख रुपये काढून घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83138 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..