
भिंवडीतून नशेचे कफ सिरप जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचा मोठा साठा मुंबई एनसीबीच्या पथकाने भिवंडीत सापळा रचून जप्त केला आहे. या कारवाईत ८ हजार ६४० सिरपच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नशेसाठी कफ सिरफ पुरवणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिस उपाआयुक्त योगेश चव्हाण व एसीपी प्रशांत ढोले यांनी नकार दिला. तसेच याबाबत गुन्हा दाखल नसल्याची प्रतिक्रिया शांतीनगर व नारपोली पोलिसांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र झाल्याने नशेडींना ड्रग्ज मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेकांनी आपली ही तलफ कफ सिरपवर काढण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांच्या दुकानात कफ सिरप कमी पैशांमध्ये सहज उपलब्ध होत असल्यामुळे ठाणे, मुंब्रा, भिवंडीसारख्या शहरांमध्ये अचानक त्याची मागणी वाढल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे आता हा ‘धंदा’ कॅश करण्यासाठी मोठे रॅकेट सक्रिय झाल्याचे दिसून येते.
भिवंडीतील आग्रा-मुंबई महामार्गावर कफ सिरपचा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई युनिटला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (ता. २१) पाळत ठेवून एका संशयित बोलेरो पिकअप गाडीला अडवण्यात आले. ही गाडी अडवल्यानंतर दोन तासांनंतर औषधे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या गाडीला पकडण्यासाठी सापळा रचला. पथकाने सुमारे २ किलोमीटर पायी पाठलाग करत औषधे घेण्यासाठी आलेल्या गाडीला पकडले. या वेळी वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो (८ हजार ६४० बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले. या छाप्यात जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
मुंबई, ठाण्यात होणार होता पुरवठा
सर्दी, खोकल्यावर कफ सिरप गुणकारी असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची मात्राही ठराविक असते; मात्र नशेसाठी एकाच वेळी २०० मिलीची बाटली नशेबाज पितात. हे सिरप ड्रग्जप्रमाणे तत्काळ परिणाम दाखवते. उत्तेजित करते आणि नंतर शरीर सुस्त करते. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये मादक पदार्थ म्हणून जप्त केलेले हे कफ सिरप पुरवले जाणार होते, अशी माहिती समोर आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83149 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..