
मोखाड्यातील ५० गाव पाड्यांमध्ये टंचाई
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २२ ः स्वातंत्र्याची ७५ वर्ष उलटूनही मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. मोखाडा तालुक्यातील तब्बल ५० गाव-पाड्यांमध्ये टंचाई आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून केलेल्या प्रयत्नांमुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी ३७ गावपाड्यांची पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे.
टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या तीन वर्षांत प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हातात हात घालून केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे तालुक्यात काही अंशी पाणीटंचाईला आळा बसला आहे. शासनाने ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून विहिरी, राष्ट्रीय पेयजल योजनेतून विहिरी, तसेच नळ पाणीपुरवठा योजना आणि टंचाई आराखड्यातून हातपंप बसविले आहेत; तर सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या माध्यमातून सौरऊर्जेच्या नळ पाणीपुरवठा व बंधारे बांधल्याने तालुक्यातील पाणीटंचाई काहीअंशी कमी झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी १०० शंभरी पार असलेल्या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या, उपाययोजनांमुळे या वर्षी ५० वर स्थिरावली आहे. त्यांना १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरम्यान, या वर्षी जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यात १९ नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. नळ पाणीपुरवठा योजना शाश्वत पाणी साठ्यावरून करण्यात येणार आहे. तसेच नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत २३ गाव-पाड्यांमधील सुमारे ९ हजार ८१७ घरांमध्ये नळजोडणी देऊन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात या नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी मोठ्या संख्येने टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या कमी होणार आहे.
गेली तीन वर्षांतील टंचाईचा आलेख
वर्ष - टंचाई ग्रस्त गाव पाडे टॅंकर संख्या
२०१८ - १९ १०६ २६
२०१९ - २० ९३ २७
२०२० - २१ ८७ २३
२०२१ - २२ ५० १७
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83152 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..