
मुसई धरणाचा पाणीसाठा सोडल्याने पाणीपुरवठा योजना कोरड्याठाक
किन्हवली, ता. २३ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या मुसई बंधाऱ्याच्या जॅकवेल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीसाठा सोडून देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे आजुबाजुच्या गावांतील नळपाणी योजना कोरड्याठाक पडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहापूर तालुक्यातील शेणवा परिसरात लघुपाटबंधारे विभागाचे मुसई येथे शेती सिंचनासाठी आरक्षित असलेला मातीचा बंधारा आहे. शेणवा, मुसई, वेहळोली, कुल्हे, शासकीय आश्रमशाळा शेणवा, मुसईवाडी, आंब्याचीवाडी व इतर अन्य आदिवासी गाव-पाड्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यावर आधारित आहेत.
या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असलेल्या अनेक विहिरींतून अनेक गाव-पाड्यांना पाणीपुरवठा होत असतो. तालुक्याच्या बहुतांश आदिवासी गाव-पाड्यांमध्ये एकीकडे भीषण पाणीटंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशातच मुसई बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या अनेक गाव-पाड्यांत नळ पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू असताना लघुपाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे संबंधित गाव-पाड्यांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बंधाऱ्याच्या जॅकवेलचे (सिंचनासाठी सोडला जाणारा मुख्य दरवाजाचे) दुरुस्तीचे काम संबंधित विभागाने ऐनवेळी हाती घेतल्याने बंधाऱ्यातील बहुतांश पाणीसाठा सोडून दिल्यावर पाणी पातळी खोलवर गेली आहे. शिवाय सिंचनासाठी सोडला जाणारा विसर्ग पूर्णपणे बंद झाल्याने विहिरींकडे जाणारे पाणीही बंद झाले असल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी नळ पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडल्या असून शेणवा, कुल्हे, मुसई, कुल्हे आश्रमशाळा व अन्य आदिवासी गाव-पाड्यांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळ्याआधी जॅकवेल दुरुस्तीचे काम करताना लघुपाटबंधारे विभागाने याबाबत पुसटशी कल्पनादेखील लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायतींना न दिल्याने गेल्या आठवडाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून या गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बंधाऱ्याच्या दरवाजात बिघाड झाला होता. आमच्याकडे दुरुस्तीशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे पावसाळ्याआधी त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. शिवाय पुढच्या वर्षी सिंचनासाठी पाणी सोडायला अडचण येऊ शकते. सद्यस्थितीत गोणपाट लावून पाणी अडवले असून दरवाजाच्या दुरुस्तीचे काम तीन-चार दिवसांत पूर्ण होईल.
- नवनाथ गोरड, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग मुरबाड
मुसई बंधाऱ्यावरील सिंचन दरवाजा दुरुस्तीच्या कामामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईबाबत मी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83191 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..