
शोषखड्ड्यांमुळे विहिरींमध्ये दुर्गंधी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : पाण्याची गरज भागवण्यासाठी गावागावात विहीर आहेत. मात्र, या विहिरींचे पाणी पिण्यासाठी योग्य राहिलेले नाही. पाण्याला दिवसेंदिवस दुर्गंधी वाढू लागल्याने अनेक गावांतील महिलांकडून या विहिरींचा उपयोग करणे टाळले जात आहे. विहिरीत कचरा, शेवाळ वाढल्याने इतर कामांसाठीसुद्धा हे पाणी योग्य राहिलेले नाही. दुर्गंधींचे मुख्य कारण हागणदारीमुक्त मोहिमेमुळे प्रत्येक कुटुंबाने बांधलेल्या शौचालयाच्या शोषखड्यातून पाझरणाऱ्या पाण्याचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एक एक पाण्याचा थेंब गरजेचा असल्याने या अडगळीत पडलेल्या विहिरींची आठवण ग्रामस्थांना होत आहे. परंतु, या विहिरी पुन्हा वापरात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. अडगळीत पडलेल्या या विहिरींच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे येऊ लागल्या आहेत. अधिकतम दाट लोकवस्तीमधील विहिरींमधील पाण्याला दुर्गंधी येत आहे. शौचालयाचे शोषखड्डे तयार करताना त्याचे नियोजन चुकल्यामुळे येथील जलस्रोत दूषित होऊ लागले आहेत.
अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र लगतच्या गावांमध्ये ही समस्या खूपच गंभीर होत आहे. येथील विहिरी, विंधन विहिरींचे पाणी दुर्गंधीबरोबरच खारट होऊ लागले आहे. समुद्रकिनारपट्टीलगत असलेल्या गावांमध्ये दाटीवाटीच्या वस्त्या व घरे आहेत. या ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्याची योजना अमलात आणली. त्यानुसार ग्रामपंचायतनिहाय आराखडा तयार करून ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, अशांना शौचालय देण्याची योजना राबवली गेली. ती राबवताना शौचालयातील मलिद्याचा खत म्हणून उपयोग आणि सांडपाणी जमिनीत पुनर्भरण व्हावे यासाठी शोषखड्डे तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरले गेले. मात्र, हे तंत्रज्ञान फोल ठरले असल्याचे आता समोर येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर स्वरूप घेत आहे.
***
का होते दूषित पाणी?
शोषखड्डे मारताना विहिरींपासून योग्य अंतर घेतलेले नाही. अनेक ठिकाणी शोषखड्ड्यांमध्ये घरगुती वापराचे पाणी सोडले जाते. जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत असताना शोषखड्ड्यातील सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या विहिरींमध्ये जाऊन मिसळत असल्याने हे पाणी दूषित होत आहे. गावाकडे दाटीवाटीने घरे असतात. या घरांमधील सांडपाणीही या विहिरींमध्ये पाझरते. परिणामी, विहिरीमधील पाण्याला दुर्गंधी येण्याचे प्रमाण उन्हाळ्यात गरजेच्या वेळेला जास्त जाणवते.
***
काय होतात परिणाम
पाणी खारट, बेचव असल्याने तहान भागत नाही. पाणी प्यायल्यास किंवा वापरल्यास नागरिकांना त्वचारोग, पोटाचे विकार बळावले जातात. जनावरेही हे पाणी पिण्याचे टाळतात. कपडे धुतल्यास कपड्यांनाही दुर्गंधी येते. एकंदरीत विहिरीत पाणी असूनही त्याचा काहीही उपयोग दुष्काळी परिस्थितीमध्ये होत नसल्याचे दिसून येत आहे.
***
सुरक्षित अंतर महत्त्वाचे
शोषखड्डे आणि हातपंप, विहीर, नदी, तलाव आदी जलस्रोत यामध्ये विशिष्ट सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. शौचालय आणि भूजल स्रोत यांच्यातील सुरक्षित अंतर ४० फूट आहे. जर पाण्याची पातळी जमिनीपासून १२ फूट खाली असेल, तर ते अंतर १० फूट कमी करता येते. कोणत्याही परिस्थितीत हे अंतर १० फुटांपेक्षा कमी असू शकत नाही. हे अंतर जमिनीतील रोगजनकांच्या प्रवासावर अवलंबून असते.
***
विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. नियमानुसार शोषखड्डा नसेल, तर ते चुकीचेच आहे. यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या भागात अशा समस्या आहेत, तेथील ग्रामस्थांनी स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. या जलस्रोताचे सर्वेक्षण करून उपाययोजना राबवता येतील.
– डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83221 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..