बदलापूरकरांना केडीएमटीचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूरकरांना केडीएमटीचा आधार
बदलापूरकरांना केडीएमटीचा आधार

बदलापूरकरांना केडीएमटीचा आधार

sakal_logo
By

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) ः बदलापूरकर गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अंतर्गत बस सेवेची मागणी करत असून ही मागणी आता लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाने बदलापुरात केडीएमटीच्या १० बस सुरू करण्याची तयारी केली असून लवकरच ही बस सेवा सुरू होईल.
साधारण चार ते साडेचार लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात रेल्वे प्रवास सोडला तर अंतर्गत प्रवासासाठी फक्त रिक्षांची सोय आहे. रिक्षा सेवा जरी उपलब्ध असली तरी वाढलेल्या रिक्षा भाड्यांमुळे स्टेशनपासून लांब अंतरावर राहणाऱ्या व स्टेशनवर येण्यासाठी रोज प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रवास खूप महागडा ठरतो. त्यात एरवीही काही सोय नसल्याने प्रवाशांची नेहमीच गैरसोय होते. अनेक वर्षांपासून या परिस्थितीवर मार्ग निघावा यासाठी अनेक नागरिक, तसेच अनेक प्रवासी संघटना प्रयत्न करत असून, प्रशासनाशी याबाबत नेहमी चर्चा, पत्रव्यवहार केले जात होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, बदलापूर शहरात बस सेवा सुरू करण्यासाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू न करता, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेचा आधार बदलापूरकरांसाठी देण्याचा विचार करण्यात आला आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली पालिकेने सुमारे दोनशे इलेक्ट्रिक बस सुरू केल्याचे समजताच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून केडीएमसीच्या काही बसची सेवा बदलापूर शहरात देण्याची विनंती केली. त्यानुसार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाने बदलापुरात अंतर्गत बस सेवा सुरू करण्यासाठी दहा बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, इतर शहरात व सेवा देताना तोटा होऊ नये यासाठी बस मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळावा, अशी संबंधित पालिकांची अपेक्षा आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन विभागाने बस सेवेच्या मार्गाचा आराखडा सादर करण्यास सांगितला आहे. त्यानुसार कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने या कामासाठी कन्सल्टंटची नेमणूक केली आहे. लवकरच हा आराखडा सादर केला जाणार आहे. दोन- अडीच महिन्यांत बदलापूरच्या अंतर्गत भागात इलेक्ट्रिक बस सुरू होणे अपेक्षित असल्याचे यावेळी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

बदलापूर पालिकने बस मार्ग निश्चित करण्यासाठी कन्सल्टन्सी नेमणूक केली असून कोणत्या मार्गावर, कोणत्या वेळेत, किती प्रवासी मिळू शकतील? त्याचबरोबर हे प्रवासी भाडे किती असावे? या संदर्भातला अहवाल ते सादर करणार आहेत. यातूनच बदलापूर शहरात लवकरच अंतर्गत परिवहन सेवा उपलब्ध होतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी कुळगाव-बदलापूर नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83228 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top