आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ
आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ

आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ

दिवा : ठाणे पालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना सगळीकडे विविध पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. दिव्यात भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर आपली कार्यालये पुन्हा सुरू करण्याचा सपाटा लावला असून रविवारी (ता.२१) आमदार नीतेश राणे यांना दिव्यात आमंत्रित करून त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्‍घाटन करून कोकणवासीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला; परंतु भाजपचा हा प्रयत्न पुरता फसल्याचे दिसून आले. कारण राणे यांच्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने बहुतांश खुर्चा रिकाम्या होत्या. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिव्यातील जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.

कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर बेडेकर नगर येथे नितेश राणे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे आणि सर्व प्रमुख पाहुणे सभेच्या ठिकाणी पोहोचून व्यासपीठावर कार्यक्रमाला सुरुवात झाली तरी खुर्च्या रिकाम्या असल्याने मोठी नामुष्की ओढवल्याचे दिसले. त्यानंतर खुर्च्या खाली असल्याबाबत नितेश राणे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी भाजपच्या सभेला लोक आल्यास त्यांना दम दिला जातो, असे तकलादू उत्तर आमदार नितेश राणे यांना दिले. आमदार राणे यांनीही व्यासपीठावरून बोलताना रिकाम्या खुर्च्या असल्याबद्दल खंत व्यक्त केली. खरं तर नितेश राणे यांच्यासारखा फायर ब्रँड नेता दिव्यात येऊनही गर्दी जमू न शकणाऱ्या दिव्यातील नेतृत्वासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नितेश राणे यांचे भाषण संपेपर्यंत जेमतेम खुर्च्या भरल्याने मोठी नामुष्की टळली असली तरी दिव्यातील पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून चांगलीच कानउघाडणी झाली असल्याचे समजते.

स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही?
स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्यानेच कालची सभा फ्लॉप झाली असल्याची एका भाजप पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुळात पाच वर्षे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जनसंपर्क कार्यालय सुरू करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची वृत्तीच, दिवेकरांनी सभेला दाखवलेली पाठ हेच मुख्य कारण असू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

दिव्यातील कोकणातील माणूस शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. हे कालच्या भाजपच्या सभेवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे. कोकणातील नेते या ठिकाणी आणून मतांचे राजकारण कोणी करू नये. तसेच शिवसेनेकडून कधीच कोणावर अन्याय केला नाही तर प्रेमच केले आहे.
- नीलेश पाटील, शिवसेना

भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या लोकांनी त्यांना सेनेने दिलेले काम करावे. इतर ठिकाणी डोके घालू नये.
- रोहिदास मुंडे, मंडळ अध्यक्ष, भाजप, दिवा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83231 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top