
धोकादायक वृक्ष पालिकेच्या रडारवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे शहरात झाडे अथवा झाडांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडतात. या घटनांमध्ये अनेकदा वाहनांचे नुकसान, शिवाय जीवितहानीदेखील होते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता पालिकेने पावले उचलत सर्वेक्षणाद्वारे धोकादायक वृक्षांची महिती गोळा केली आहे. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत एक हजार ७६ झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात आतापर्यंत १०३ धोकादायक वृक्ष आढळून आल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
कासारवडवली भागात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांवर झाडाची फांदी पडून त्यात ते जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय धोकादायक फांद्या रस्त्यावर लोंबकळत असल्यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती स्तरावर हे सर्वेक्षण असून, त्यात १०३ वृक्ष धोकादायक आढळून आले आहेत. हे सर्वेक्षण अजूनही सुरूच असल्यामुळे धोकादायक वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेकडून सध्या धोकादायक फांद्या छाटणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये आतापर्यंत १,०७६ फांद्या छाटण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.
मजबुतीकरण, पुनर्रोपण...
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणात धोकादायक वृक्षांचा शोध घेतला जात आहे. यात आजुबाजूची माती निघून गेल्यामुळे वृक्ष धोकादायक बनले असतील, तर त्या ठिकाणी माती टाकून त्याचे मजुबतीकरण करण्यात येत आहे. काही वेळेस वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य असेल, तर त्याप्रमाणे त्याचे पुनर्रोपण केले जात आहे. ज्या ठिकाणी काहीच शक्य नाही, तेथील वृक्ष काढले जात आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
घटनांवर दृष्टिक्षेप
पाचपाखाडी भागात एक वृक्ष उन्मळून पडला. त्यात दुचाकीवरून जात असलेले ॲड. किशोर पवार हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी मासुंदा तलाव भागातील गुलमोहराचे एक झाड रिक्षावर पडले होते. त्यात रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. स्थानक परिसरातही नारळाचे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83252 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..