
आठवड्याच्या भाजीला ५००ची नोटही पुरत नाही...
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : महागाईचा तडाखा बसून सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर आधीच वाढलेले असताना, आता मंडईतील भाजीपाल्याचे दर पुन्हा कडाडल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून किरकोळ भाजी मंडईत टोमॅटो, पालेभाज्या तसेच बटाटे, लसूण यांसारख्या दैनंदिन स्वयंपाकासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचे भाव प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आठवड्याची भाजी खरेदीसाठी ५०० रुपयाची नोटही पुरत नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करीत आहेत.
ठाण्यातल्या जांभळी नाका येथील मुख्य भाजी मंडईत वाशी, कल्याण, नाशिक, बंगळूरु आदी शहरातून भाजीपाल्याची आवक होते. मात्र मागील काही दिवसात वाढलेला उकाडा तसेच वाढलेले इंधनदर आदी कारणांमुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याचे ठाण्यातील भाजीविक्रेत्यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून शहरातील किरकोळ भाजी मंडईतील टोमॅटोचे प्रतिकिलो दर हे ३० ते ४० रुपयांवरून ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. दर वाढल्याने ग्राहकांकडून किलोने खरेदी केल्या जाणाऱ्या टोमॅटोची खरेदी सध्या पाव किलोवर आली आहे. आवक नियमित होईपर्यंत टोमॅटोचे दर पुढील काही दिवस चढेच राहतील, असे विक्रेते मनोजकुमार जैस्वाल यांनी सांगितले. आवक कमी झाल्याने बाजारपेठेत बटाटे आणि लसूणचेही दर आधीच्या तुलनेत २० ते ३० रुपयांनी वाढले असून सध्या बटाटे ३० रुपये किलो; तर लसूण २०० ते १६० रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत.
पालेभाज्याही महाग
भाजी मंडईत पालेभाज्यांची आवकही कमी झाल्यामुळे पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे दर हे २५ ते ३० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे काही प्रमाणात पालेभाज्यांचे नुकसान झाले. ठाणे शहरातील किरकोळ बाजारात मेथी प्रतिजुडी ३० रुपये, शेपू ३० रुपये पालक १५ ते २०, लाल आणि हिरवा माठ २५, कोथिंबीर २० ते ३० रुपये; तर चवळी २० ते २५ रुपयांपर्यंत विकली जात आहे. पावसाळ्यात पालेभाज्यांचे नुकसान होऊन त्यांचे दर ५० रुपये प्रतिजुडीपर्यंतही जाऊ शकतात, असे विक्रेते जाधव यांनी सांगितले.
चार ते पाच दिवसांपासून भाज्यांची आवक कमी झाल्याने तसेच वाहतूक खर्च वाढल्याने मंडईत काही भाज्यांचे दर वाढले आहेत. ग्राहक भाज्यांचे दर वाढल्याबद्दल तक्रार करतात. काही दिवसांत भाज्यांची आवक नियमित झाली; तर दर पुन्हा कमी होतील.
- गोविंद कुसवा, भाजीविक्रेते
जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने आधीच घराच्या बजेटवर ताण होता. आता भाज्यांचेही दर वाढल्याने आठवड्याच्या भाजीखरेदीला ५०० रुपयांची नोटही पुरत नाही. वाढत्या महागाईत सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा गहन प्रश्न आहे.
- सुषमा निकम, ग्राहक
भाज्यांचे दर रुपये (प्रतिकिलो ) :
भाज्या आधी आता
टोमॅटो ३० ते ४० ७० ते ८०
मटार १२० २००
वांगी ८० ८०
फ्लॉवर ३० ते ४० ६०
कोबी ४० ६०
हिरवी मिरची ८० १२०
मेथी (प्रतिजुडी) २० ते २५ ३०
शेपू २० ते २५ ३०
पालक १० १५ ते २०
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83257 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..