
मध्य रेल्वेचा मान्सूनपूर्व आढावा
मुंबई, ता. २३ : आगामी पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनपूर्व कामास सुरुवात केली आहे. विविध उपाययोजनांमध्ये कर्जत-लोणावळा आणि कसारा-इगतपुरी घाट विभागात विशेष भर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सोमवारी कल्याण-लोणावळा विभागाची पाहणी केली आणि सर्व उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. पावसाळ्यात घाट विभागात दरड कोसळून रेल्वे वाहतूक खोळंबण्याचा धोका असतो. अशा दुर्घटनांवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे दरडप्रवण भागातील धोकादायक ठिकाणी १४५ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. यापैकी ८७ सीसी टीव्ही कॅमेरे कर्जत-लोणावळा विभागातील १९ ठिकाणी, तर ५८ सीसी टीव्ही कॅमेरे कसारा-इगतपुरी विभागातील ११ ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय घाट विभागात स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. जाळीच्या कामांबरोबरच दरड कोसळू नये, यासाठी खडकांचे अडथळे आणि टनेल पोर्टलची कामेही हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय २४ तास कार्यरत असून हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षासह महत्त्वाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण होत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83291 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..