
ऑनलाईन फसवणुकीबाबत ‘अदाणी’कडून आवाहन
मुंबई - अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनी आपल्या वीज ग्राहकांना केव्हाही त्यांचे वैयक्तिक बँक तपशील वा ओटीपी देण्यास सांगत नाही. त्यामुळे अशी माहिती मागणाऱ्या ऑनलाईन ठकसेनांपासून सावध राहावे, असे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीने केले आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांच्या वीजबिलाचे पेमेंट हे कंपनीच्या सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारेच होतात; तरीही ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे झाली आहेत. हे ठकसेन वीज वितरण कंपनीच्या कॉल सेंटरचे अधिकारी आहेत, असे सांगून एसएमएस/ई-मेलद्वारे बनावट ऑफर देऊ करतात आणि ग्राहकांना मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगतात. तसेच काही बनावट वेबलिंकवर क्लिक करायला सांगतात.
फसवणूक करणाऱ्या या व्यक्ती त्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यावरील पैसे लंपास करण्यासाठी बँक तपशिलांसह वैयक्तिक माहितीही विचारून घेतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉलला प्रतिसाद देऊ नये किंवा त्या ठकसेनांनी सांगितलेल्या वेबलिंकवर क्लिक करू नये. कंपनी किंवा आमचे सहयोगी किंवा प्रतिनिधी केव्हाही अशा दुसऱ्या पेमेंटलिंक ग्राहकांना देणार नाहीत किंवा ग्राहकांकडून ओटीपी किंवा कोणतेही बँक तपशील मागत नाहीत. ग्राहकांनी अशा ठकसेनांपासून सावध राहावे आणि कंपनीच्या सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारेच वीज देयक भरावे, असे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने केले आहे.
विविध पर्याय उपलब्ध
एईएमएल मोबाईल ॲप हे विजेचे बिल भरण्यापासून ते ग्राहकाचे नाव बदलण्यासाठी अर्ज करण्यापर्यंतच्या सर्व सेवा उपलब्ध करून देते. या ॲपद्वारे ग्राहक त्यांची पूर्वीची बिले आणि वापरदेखील तपासू शकतात. फोन पे, गुगल पे, पेटीएम, भिम ॲप आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे ग्राहक आपली विजबिले भरू शकतात. अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या संकेतस्थळावर विविध मार्गांनी बिलभरणा केला जाऊ शकतो, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83335 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..