
वडाळ्यातील नाले कचऱ्याने ‘ओव्हर फ्लो’
वडाळा, ता. २४ (बातमीदार) : पावसाळा तोंडावर आला, तरी मुंबईच्या अनेक भागातील नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. वडाळा पूर्वेतील मुख्य नालाही असाच कचऱ्याने ओव्हरफ्लो झालेला आहे. पालिकेने नालेसफाईची ३१ मेपर्यंतची डेडलाईन दिली आहे; परंतु या नाल्याची डेडलाईनपूर्वी सफाई न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातही हा भाग जलमय होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
वडाळा पूर्वेतील कोरबमिठागर, काळेवाडी, मानुरवाडी, आदर्श रमाईनगर, लक्ष्मणनगर आदी भागात साधारण दोन लाखाहून अधिक लोकवस्ती आहे. सागरबार-मानुरवाडी-काळेवाडी-वाय जंक्शन नाला हे छोटे-छोटे नाले आदर्श रमाई नगर या मोठ्या नाल्याला जोडलेले आहेत. हा भाग सखल असल्याने दरवर्षी नाल्यातील सांडपाणी लोकवस्तीत शिरते. महापालिका एफ उत्तर विभागाकडून वेळच्या वेळी नालेसफाई करण्यात येत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. आदर्श रमाई नगर नाला समुद्राला जोडलेला आहे. पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यास नाल्यालगतच्या लोकवस्तीतील घरांमध्ये पाणी तुंबण्याचा धोका यंदाही कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
मान्सूनपूर्व नाल्यांच्या साफसफाईचे काम पालिकेने सेंट्रल एजन्सीला दिले आहे; परंतु अद्याप पूर्णतः नालेसफाई झालेली नाही. नाल्यातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहनाला ट्रॅकिंग सिस्टम लावणे बंधनकारक असतानाही गेल्या पाच वर्षांत कधीच ही सिस्टिम लावण्यात आलेली नाही.
- पुष्पा कोळी, माजी नगरसेविका, काँग्रेस
दररोज नाल्याच्या सफाईचे काम दोन शिफ्टमध्ये १६ तास केले जाते. नाल्यातून काढलेला कचरा-गाळ वेळच्या वेळी ट्रकमधून वाहून नेला जातो. त्याच्या मोजमापासाठी कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये ट्रॅकिंग सिस्टिम लावण्यात आली आहे.
- गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83371 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..