
ठाण्यात ‘मासिका’ महोत्सवाचे आयोजन
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : समाजात मासिक पाळीसंबंधी खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, अवैज्ञानिक रुढी-परंपरा, मासिक पाळीबद्दल वाटणारी लाज, जागरूकतेचा अभाव, पितृसत्ताक समाजपद्धती, अ-समावेशक पायाभूत सुविधा, गरिबी आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या एकूण जाचक रीती यांचा महिलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मासिक पाळीविषयी चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी आणि त्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यातील म्युज फाऊंडेशन आणि समाजबंध या संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. या संस्थाकडून ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ साजरा करण्यात येणार आहे. २१ मे ते २८ मे हा संपूर्ण आठवडा विविध उपक्रम राबवून यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी २८ मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून साजरा केला जातो. ठाण्यातील म्युज फाऊंडेशन ही संस्था मागील ५ वर्षांपासून यानिमित्ताने ‘मासिका महोत्सव’ साजरा करीत असून यंदा हा उत्सव ४ खंडांमधील ९ देशांमध्ये साजरा होणार आहे. ‘सस्टेनेबल मासिक पाळी’ ही या उत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यात २० हून अधिक पार्टनर-एनजीओचे सहकार्य संस्थेला लाभले आहे. म्युज फाऊंडेशन मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी नवी मुंबई आणि ठाणे शहरात २८ मे आणि २९ मे रोजी महोत्सव साजरे करणार असून यात नृत्य आणि संगीत, मासिक पाळीच्या थीमवर आधारित खेळ, पथनाट्य, कार्यशाळा अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
‘पिरियड रिव्होल्यूशन२०२२’ या अंतर्गत ठाण्यातील समाजबंध ही संस्थादेखील २२ ते २८ मेदरम्यान ऑनलाईन माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. मासिक पाळीवर आधारित पोस्टर कॅम्पेन, मीच आहे तो बदल अभियान, अभिवाचन स्पर्धा, अभिव्यक्ती स्पर्धा, तसेच ‘तिचा स्वातंत्र्यलढा’ या उपक्रमाअंतर्गत लेख स्पर्धा अशा विविध स्पर्धा आणि अभियान समाजबंध संस्थेच्या वतीने आठवडाभर राबवले जात आहेत. या माध्यमातून स्त्रियांनी मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने बोलावे, असा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.
---
जगभरात महिलांच्या मासिक पाळीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. तेव्हा महिलांनी तसेच सजग नागरिकांनी मासिक पाळी या विषयावर आपली मते मांडावीत. त्यातून महिलांमध्ये आणि समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने मासिका महोत्सव आयोजित केला आहे. या माध्यमातून काही प्रमाणात का होईना, नागरिकांमध्ये वैचारिक बदल घडतो आहे, असे निशांत बंगेरा (म्युज फाऊंडेशन) यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83408 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..