निवडणुकीच्या तोंडावर उद्‍घाटनांचा सपाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्या तोंडावर उद्‍घाटनांचा सपाटा
निवडणुकीच्या तोंडावर उद्‍घाटनांचा सपाटा

निवडणुकीच्या तोंडावर उद्‍घाटनांचा सपाटा

sakal_logo
By

वाशी, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका या मागील दोन वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे इच्छुक उमेदवारदेखील कामाला लागले आहेत. राजकीय नेत्यांकडूनही प्रभागांमध्ये बांधणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी नवी मुंबई परिसरात उद्‍घाटनांचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २१) ऐरोली येथील धर्मवीर आनंद दिघे मैदान, घणसोली सेक्टर ९ येथील संत निरंकारी चौकाचे सुशोभीकरण व सानपाडा येथील झाशीच्या राणी मैदानात विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले; तर रविवारी (ता. २२) आमदार तथा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ऐरोली, दिवा कोळीवाडा चौक येथील स्थापत्य कामे, ऐरोली सेक्टर दोनमधील मोकळ्या जागेमध्ये आणि ऐरोली सेक्टर पाच येथे उद्यान, तसेच ऐरोली सेक्टर चार येथील धर्मवीर संभाजी राजे उद्यानात आसन व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना, भाजपकडून उद्‍घाटन करण्यात येत असल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे जवळपास तीन वेळा पालिका निवडणुका पुढे गेल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारही हतबल झाले आहेत, पण आता पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने उद्‍घाटन व लोकार्पणाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत.

शिवसेनेचे वरातीमागून घोडे
ऐरोली सेक्टर तीनमधील धर्मवीर आनंद दिघे मैदानाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र त्याच दिवशी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यामुळे ठाकरे यांचा नवी मुंबईतील दौरा रद्द करण्यात आला, तर दोन महिने या मैदानाचे लोर्कापण करण्यात न आल्यामुळे मनसेकडून हे मैदान क्रीडाप्रेमींसाठी खुले करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेकडून लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे या मैदानाचे फक्त श्रेयासाठी उद्‍घाटन करण्यात येत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83480 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top