
विमानतळावरील प्रतीक्षालयाची एलटीटीवर अनुभूती
मुंबई : मध्य रेल्वेवरून उत्तर भारत किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात एलटीटी येथून मार्गस्थ होतात. या स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते; परंतु एखादवेळी एक्स्प्रेस उशिराने येत असल्यास प्रवाशांची स्थानकात लटकंती होत होती. यासाठी प्रतीक्षालयही उभारण्यात आले होते; परंतु या प्रतीक्षालयाला आता आधुनिक रूप देण्यात आले आहे. विमानतळावरील प्रतीक्षालयात मिळणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
एक्स्प्रेसने प्रवास करणारे प्रवासी रेल्वेस्थानकात हातात मोठमोठ्या बॅगा घेऊन येतात. गावी किंवा फिरायला जाण्याची लगबग आणि त्यात ताटकळत उभे राहणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरते. ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना १० रुपये प्रतितास शुल्कात नवीन अत्याधुनिक वातानुकूलित वेटिंग रूम सुरू केले आहे; तर विना वातानुकूलित प्रतीक्षालय प्रवाशांना निःशुल्क वापरायला मिळणार आहे.
सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून या प्रतीक्षालयाचा कायापालट केला असून, सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी ते सुसज्ज आहे. एका खासगी कंपनीला हे प्रतीक्षालय पाच वर्षांसाठी चालवण्यास देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वातून प्रतीक्षालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणीही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एलटीटी येथील प्रतीक्षालयातील सुविधांमुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रवाशांना काय सुविधा मिळणार ?
- बसण्याासाठी सोफा, कॅफे सिटिंग
- कॅटरिंग सुविधा
- शौचालय आणि आंघोळीची व्यवस्था
- आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध
- सामान ठेवण्याची व्यवस्था
- मोबाईल चार्जिंग आणि वाय-फाय सुविधा
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83484 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..