मुंबईच्या वीर जिजामाता उद्यानात प्राण्यांची उष्णतेच्या लाटेवर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजामाता उद्यानातील विशेष उपाययोजना फलदायी
प्राण्यांची उष्णतेच्या लाटेवर मात

मुंबईच्या वीर जिजामाता उद्यानात प्राण्यांची उष्णतेच्या लाटेवर मात

मुंबई : कोस्टल सिटी अशी ओळख असलेल्या मुंबईत माणसांसोबतच प्राण्यांचीही यंदाच्या तीव्र उकाड्याने परीक्षा घेतली. अंगाची लाहीलाही होतानाच सहन न होणारे उन्हाचे चटके हे प्राण्यांनाही बसले; परंतु मुंबईच्या वीर जिजामाता उद्यानात अशा उष्णतेच्या कालावधीत प्राण्यांची विशेष काळजी यंदा घेण्यात आली. अगदी प्राण्यांच्या निवाऱ्यापासून ते प्राण्यांच्या खाण्याच्या सवयींचाही अभ्यास करून उपाययोजना केल्याने वातावरणातील बदलांसोबत प्राण्यांनीही मिळते-जुळते घेतले. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे प्राण्यांच्या आरोग्यावर कोणताही मोठा परिणाम झाला नसल्याचे प्राणी शास्त्रज्ञांनी सांगितले.

भायखळा येथील जिजामाता उद्यानात प्राण्यांच्या, तसेच पक्ष्यांच्या निवाऱ्याची सुविधा अतिशय नैसर्गिक पद्धतीने करण्यात आली आहे. अगदी सावली असो वा निवाऱ्याची जागा, प्राण्यांना प्रत्यक्षात जंगलात असल्याचा भास व्हावा, अशी रचना या ठिकाणी करण्यात आली. बहुतांश प्राण्यांच्या पिंजऱ्यांना झाडांच्या सानिध्यातच ठेवण्यात आले. त्यासोबतच पाण्याची व्यवस्थाही राहत्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांना उकाडा होऊ लागल्यास हे प्राणी पाण्यात मनसोक्त डुबकी मारून मग बाहेर पडतात. विशेषतः वाघ हा सकाळी पाण्यात एक डुबकी मारतोच. त्याशिवाय इतर प्राणीही दुपारी उकाडा जाणवू लागताच पाण्यात डुबकी मारताना दिसतात. अनेक वेळा पाण्याचे फवारे मारून उष्णतेचा दाह कमी करण्यासाठीही उद्यानात काळजी घेण्यात येते. वातावरणीय बदलांचा प्राण्यांच्या आरोग्यावर विशेष कोणताही मोठा बदल झाला नसल्याचे जिजामाता उद्यानातील अधिकारी सांगतात. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे इतर ठिकाणी जिथे पक्षी, प्राणी आजारी पडताना दिसत होते, तिथे जिजामाता उद्यानात मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

...असा होता खाद्यपुरवठा
१) मानवाला ज्याप्रमाणे हंगामानुसार फळे आवडतात तशाच आहाराचा पुरवठा जिजामाता उद्यानातील हत्ती, माकडांना करण्यात आला. केळी, फणस यांसारखी फळे या उकाड्याच्या कालावधीत देण्यात आली.
२) मांसाहार करणाऱ्या प्राण्यांच्या आहाराचीही विशेष तजवीज करण्यात आली. वाघ तसेच कोल्हा यांना मटण देताना हे मटण आईस क्युब बॉक्समध्ये देण्यात येते. त्यामुळे प्राण्यांना खाद्याबरोबर बर्फातून थंडावाही मिळाला.
३) प्राण्यांच्या आहाराबरोबर पक्ष्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेण्यात आली. पक्ष्यांना अन्न पुरवताना काय बदल असावेत याचा विचार केला गेला. त्यामुळेच अशा उष्णतेच्या लाटेवर उद्यानातील प्राणी-पक्ष्यांनी मात केली.
४) प्राणी-पक्ष्यांप्रमाणेच पाणपक्ष्यांच्या बाबतीतही विशेष व्यवस्था उद्यानात करण्यात आली. पाणपक्ष्यांनाही खाण्यासाठी दिले जाणारे मासे आईस क्युबमध्ये देण्यात येतात. त्यातून खाद्याबरोबरच थंड पाणीही मिळते.

जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांच्या वागणुकीच्या अनुषंगानेच उद्यानातील प्राणी-पक्ष्यांच्या आहाराचा आणि निवाऱ्याचा विचार करण्यात आला आहे. पर्यावरणाशी मिळते-जुळते घेण्यासाठी पक्ष्यांच्या निवाऱ्याची आणि अन्नाचीही सोय करण्यात आली. त्यामुळेच उष्णतेच्या लाटेचा विशेष परिणाम उद्यानात झाला नाही.
- अभिषेक साटम, प्राणी शास्त्रज्ञ, जिजामाता उद्यान, भायखळा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83505 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top