ठाणे शहरात ७५ टक्के नालेसफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे शहरात ७५ टक्के नालेसफाई
ठाणे शहरात ७५ टक्के नालेसफाई

ठाणे शहरात ७५ टक्के नालेसफाई

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ ः ठाणे शहरात पावसाळ्याच्या काळात पाणी साचून होणारी गैरसोय टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येत असते. याच नालेसफाईवरून नुकतेच पालिका प्रशासनाने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यात शहरात केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई करण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर बुधवारी उपायुक्त मनीषा जोशी यांनी पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेत नालेसफाईचा आढावा घेतला. त्यावेळी शहरातील नाल्यांची ७५ टक्के सफाई झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, दिव्यासह कोपरी-नौपाडा उथळसरमध्ये नालेसफाई कासवगतीने होत असल्याची माहिती समोर आली. सर्वाधिक ८४ टक्के नालेसफाई वर्तकनगर प्रभाग समितीत झाली असून लोकमान्य आणि कळवा प्रभाग समितीत ७८ टक्के इतकी नालेसफाई करण्यात आली आहे.
सोमवारी पालिका प्रशासनाकडून ठेकेदारांची बैठक घेऊन प्रत्येक ठेकेदाराकडून नालेसफाई कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही ठेकेदारांनी ६० ते ७० टक्के, तर काहींनी ९० टक्के नालेसफाईची कामे केल्याचा दावा केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र हे दावे खोडून काढत नालेसफाई निरीक्षणातून केवळ ४० ते ५० टक्केच कामे पूर्ण झाल्याचे दिसून आले असल्याचे समोर आले होते. अशातच बुधवारी, ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत नालेसफाईचा आढावा प्रभाग समितीनिहाय घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी नालेसफाई करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. तसेच नालेसफाई करत असताना नाल्यांमध्ये नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकवस्तीतील नागरिकांकडून घरातील कचऱ्यासोबतच चादरी, गाद्या तसेच सोफादेखील आढळून आला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे नालेसफाई करीत असताना अडचणीचे येत असल्याचे सांगितले.
दरम्यान, ठाणे शहरातील ९ प्रभाग समितीअंतर्गत एक लाख ९६ हजार १९९ मीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी एक लाख ४६ हजार ९८५ मीटरची नालेसफाई झाली असून ७५ टक्के सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

तक्ता

प्रभाग समिती नालेसफाई (टक्केवारीमध्ये)

मुंब्रा ७४

कळवा ७८

माजिवडा मानपाडा ७६

कोपरी - नौपाडा ७१

उथळसर ७३

वागळे इस्टेट ७२

दिवा ७०

वर्तकनगर ८४

लोकमान्य सावरकर नगर ७८


समाधानकारक नालेसफाई झाली आहे. तसेच ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण होतील. तसेच पावसाळ्याच्या काळात नाले तुंबून आपत्तीजनक परस्थिती निर्माण होणार नाही याचीदेखील दक्षता घेण्यात येणार आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83535 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top