
मारहाण झालेल्या श्वानाची उत्कर्ष संस्थेतर्फे सुटका
मुंबई, ता. २५ ः भांडुप परिसरात चार महिन्यांच्या श्वानाला सांभाळणाऱ्याकडूनच मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार आढळून आला. त्यानंतर उत्कर्ष या प्राणिमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या श्वानाची सुटका केली.
भांडुप (पू.) परिसरातील खान चाळ येथे एका चार महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला सांभाळण्याचे काम एका व्यक्तीकडे होते. मात्र तो मनोरुग्ण होता व तोच त्या श्वानाला मारहाण करीत असे. त्यामुळे तो श्वान जखमीही झाला होता. तेथील भक्ती या प्राणिमित्र मुलीने उत्कर्ष संस्थेला हा प्रकार सांगितला. उत्कर्षच्या राजश्री इंगळे, यश गिरी व ओम राणे आदी कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन पोलिसांच्या साह्याने त्या श्वानाचा ताबा घेतला व त्याला मुलुंडच्या उत्कर्ष प्राणी रुग्णालयात दाखल केले. आता त्या श्वानाची प्रकृती ठीक आहे.
उत्कर्ष संस्थेतर्फे भटक्या प्राण्यांच्या हितासाठी धडपड केली जाते. मुलुंडच्या उत्कर्ष रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही केले जातात. तसेच महापालिकेच्या मान्यतेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणही केले जाते, असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. दगडू लोंढे यांनी सांगितले. हे रुग्णालय संपूर्णपणे दात्यांच्या देणग्यांवरच चालवले जाते. त्याखेरीज लातूर, नांदेड, शिर्डी, सातारा, अंबरनाथ येथेही संस्थेची प्राणी रुग्णालये आहेत. मुंबईत कोठेही प्राण्यांवर अत्याचार होत असतील तर खालील उत्कर्षच्या ९८३३८०१४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83545 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..