पोलिस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम सुरु
पोलिस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम सुरु

पोलिस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम सुरु

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानल्या जाणाऱ्या देहर्जे प्रकल्पाच्या कामाला मंगळवारपासून पोलिस बंदोबस्तात पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. पोलिस फौजफाट्यात सुरू असलेल्या या कामाबाबत बाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुनर्वसन व भूसंपादनाबाबत कोणतेही ठोस आश्वासन न देता सुरू असलेले काम म्हणजे दंडेलशाही असल्याचा आरोप बाधित कुटुंबांनी केला आहे.
विक्रमगड तालुक्यातील साखरे गावाच्या परिसरात देहर्जे हा प्रकल्प सुरू असून ९३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या या धरणात २३८ हेक्टर खाजगी लाभार्थ्यांची जमीन पाण्याखाली जाणार आहे. प्रकल्पात खुडेद, तीवसपाडा, पवारपाडा, जाधवपाडा, जांभा या गाव पाड्यांवरील जवळपास ४०२ कुटुंबे बाधित होणार आहेत.
पुनर्वसन व भूसंपादन मोबदला याबाबत शासनाने अजूनही कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने पूर्णतः आदिवासी लोकवस्ती असलेल्या बाधित कुटुंबांमध्ये वेगवेगळे समज- गैरसमज निर्माण होत आहेत. यातच संघर्ष समितीच्या नावाने स्थापन झालेल्या बाधित समूहाने धरण नको अशीच भूमिका घेऊन प्रकल्पाला विरोध दर्शविल्याने प्रकल्प उभारणीत बाधा निर्माण झाली होती. मंगळवारी अखेर जवळपास १७५ पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाच्या जमिनीखालील कामाला सुरुवात करण्यात आली असून यात कोणत्याही खासगी जागा मालकाला बाधा निर्माण होणार नाही, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांच्या बंदोबस्तात काम सुरू असलेली ही दंडेलशाही आमच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारी आहे. खातेदारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात येत असलेले काम अन्यायकारक असून आमचे पुनर्वसन फक्त विक्रमगड तालुक्यात करावे.
- काशिनाथ चौधरी, बाधित शेतकरी, तीवसपाडा

पुनर्वसन व मोबदला मिळत नाही तो पर्यंत धरणाचे काम सुरू केले जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. अनेक बाधित शेतकरी सर्व्हेक्षण कार्यात सहकार्य करत नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब होत आहे.
- दिनेश शेवाळे, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे प्रकल्प विभाग

विक्रमगड बातमीदार-अमोल सांबरे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83568 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top