
मध्य रेल्वेच्या विस्टाडोमला उत्तम प्रतिसाद
मुंबई, ता. २५ : मध्य रेल्वेने मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे मार्गावर सुरू केलेल्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ ऑक्टोबरपासून २३ मेपर्यंत तब्बल ५० हजार प्रवाशांनी विस्टाडोम डब्यातून प्रवास केला.
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीनला विस्टाडोम डबे बसवण्यात आले. दोन्ही लोहमार्गावरील दऱ्या-खोऱ्या, नदी, पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रवाशांकडून विस्टाडोम डब्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने ४९ हजार ८९५ प्रवाशांची नोंदणी करून ६.४४ कोटी महसूल मिळवला आहे.
मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. त्याला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे गेल्या वर्षी २६ जूनपासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला आणि १५ ऑगस्टपासून डेक्कन क्वीनला विस्टाडोम डबा जोडण्यात आला. या तिन्ही विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
---
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्यातून १८ हजार ६९३ प्रवाशांनी प्रवास केला, त्यातून रेल्वेला ३.७० कोटींचे उत्पन्न मिळाले.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे डेक्कन क्वीनच्या विस्टाडोम डब्यातून १४ हजार ७४९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला १.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले.
३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमधून १६ हजार ४५३ प्रवासी वाहतुकीतून १.११ कोटी महसूल प्राप्त झाला आहे.
---
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83574 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..