
दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती
मुंबई, ता. २५ : मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच नव्हे, तर दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी नागरिकांना १५ दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर नव्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर ५०० दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
मुंबईत अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट मोटारसायकल चालवतात, त्यासोबतच दुचाकीवर मागे बसणारी व्यक्तीही हेल्मेट वापरत नाही. त्यामुळे अनेकदा अपघातात नाहक जीवितहानी होते. त्यामुळे नव्या मोटार वाहन कायद्यांतर्गत मुंबई वाहतूक शाखेकडून दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट खरेदीसाठी मुंबईकरांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर दुचाकीवर मागे बसणाऱ्या विनाहेल्मेट नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.
मुंबई वाहतूक विभागाने याबाबतच्या आदेशाचे पत्र आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा हेल्मेटवापराबाबत जनजागृती करणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83590 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..