
बेपत्ता कारागृह शिपाई घरी परतला
ठाणे, ता. २६ ः ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांवर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर मागील चार दिवस बेपत्ता झालेला कारागृह शिपाई त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) असे बेपत्ता झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. पल्लेवाड हे कारागृहात कार्यरत असून ते २१ मे २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारागृह परिसरातून अचानक बेपत्ता झाले होते.
अशोक यांच्या पत्नी ममता पल्लेवाड यांनी २२ मे २०२२ रोजी ठाणेनगर पोलिस ठाण्यात अशोक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. एकीकडे त्यांचा शोध सुरू असतानाच ते बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कल्याण येथील घरी सुखरूप परतले. त्यानंतर त्यांनी स्वतः ठाणेनगर पोलिस ठाण्यात सायंकाळी पाचच्या सुमारास येऊन आपली मानसिक स्थिती बरी नसल्याने घर सोडल्याची माहिती दिली. ठाणे कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याकडून होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळल्यामुळे आपण एका मित्राकडे गेल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. शनिवारी रेल्वेने मनमाड गाठले. त्यानंतर भानावर आल्यावर पत्नीला फोन केला आणि घरी परतल्याची माहिती त्यांनी चौकशीत ठाणेनगर पोलिसांना दिली.
गुन्हेगारांच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अशोक पल्लेवाड यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. त्यात तळोजा कारागृहातही एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २१ मे पासून ते विनापरवानगी गैरहजर आहेत. जर कोणाच्याही भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी. समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करणे चुकीचे आहे.
- हर्षद अहिरराव, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83598 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..