
धरण उशाला कोरड घशाला!
खर्डी, ता. २६ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील टेंभा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण आहे. हे ज्या वैतरणा नदीवर बांधण्यात आलेले आहे त्या नदीकाठच्या गावांना मात्र आजही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या धरणातून १०० किलोमीटर असलेल्या मुंबईसारख्या महानगरीला पाणीपुरवठा केला जातो; परंतु याच वैतरणा नदीच्या काठावर वसलेल्या भोसपाडा, जांभूळपाडा, घाटाळपाडा, रोजपाडा, वाखपाडा या पाच आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. टेंभा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या भोसपाड्यासह येथील आदिवासी पाड्यातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डबक्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
पाचही आदिवासी पाड्यांची लोकसंख्या १२०० च्या आसपास असून या ठिकाणी असलेल्या विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शहापूर पंचायत समितीमार्फत दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात टँकरने अपुरा पाणीपुरवठा केला जातो; परंतु या
पाड्यांसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी मोडकसागर धरणाच्या बॅक वॉटरमधून किंवा जवळच अर्धा किमीवर असलेल्या वैतरणा नदीपात्रातून भोसपाडा नळपाणी पुरवठा योजना तयार करून या गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. टंचाईग्रस्त गावे भावली पाणीपुरवठा योजनेत जरी समाविष्ट असली तरी सदर योजना होण्यासाठी किमान ३ ते ४ वर्षे लागतील. त्यामुळे या ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.
येथील आदिवासी पाड्यांना वर्षानुवर्ष पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; परंतु याकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. आमच्या गावात मोडकसागर धरण आहे. बाराही महिने वाहणारी वैतरणा नदी आहे, तरी या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटू शकत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- प्रकाश आमले, सदस्य, ग्रामपंचायत टेंभा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83625 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..