
कोपरखैरणे विभागात वाहतूक कोंडीचे ग्रहण
घणसोली, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबईतील कोपरखैरणे विभाग हा दाट लोकसंख्या असलेला विभाग आहे. परिसरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढू लागल्याने कोपरखैरणे विभागातील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करणे पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
कोपरखैरणे विभागातील रस्त्यावरील दैनंदिन बाजार, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांमुळे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. तसेच एखाद्या घराचे अथवा इमारतीचे काम निघाले, तर बांधकाम साहित्याच्या अवजड वाहनांमुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोपरखैरणे विभागात अंतर्गत भागात नो पार्किंग झोनमध्येही वाहने पार्किंग केली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अवजड वाहने आली तर साधारणत: अर्धा तास वाहतूक कोंडी होते.
वाहनांची कोंडी झाल्यामुळे सतत हॉर्न वाजवल्याने परिसरातील नागरिक, तसेच दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांनाही ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. अशा वेळेस एखादी आगीची मोठी घटना घडली, तर अग्निशमन दलाला पोहचण्यासाठीदेखील मोठी अडचण होते. तसेच रुग्णवाहिकेलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. अंतर्गत भागातील वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार, असा सवाल कोपरखैरणेतील रहिवासी करत आहेत.
कोपरखैरणेतील गल्ल्या अरुंद असल्याने नागरिकांना चालण्यात अडथळा होत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. रस्त्याच्या दोनही बाजूला वाहने पार्क केल्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
- अनिकेत कांबळे, नागरिक
कोपरखैरणे विभागातील अंतर्गत परिसरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाची कारवाई सुरू आहे. अनेकदा वाहतूक विभागाकडून कारवाईदेखील करण्यात आली आहे.
- उमेश मुंडे, पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83640 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..