परिचारिकांचे आता राज्यभर ‘काम बंद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिकांचे आता राज्यभर ‘काम बंद’
परिचारिकांचे आता राज्यभर ‘काम बंद’

परिचारिकांचे आता राज्यभर ‘काम बंद’

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. २३ ते २५ मे असे तीन दिवस परिचारिकांनी रुग्णालयात एक तास काम बंद करून निषेध व्यक्त केला. मात्र, आजपासून परिचारिकांनी राज्यभर काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.
दरम्यान, आमच्या गैरहजेरीत रुग्णालयातील रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील, असे परिचारिकांनी स्पष्ट केले आहे.

तीन दिवसांपासून परिचारिका मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत; पण प्रशासनातील कोणत्याही मंत्र्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. बैठकीसाठी वेळही दिलेला नाही. प्रशासन जर अशा प्रकारे टाळाटाळ करत असेल, तर आंदोलनावर तोडगा निघणे शक्य नाही. बेमुदत आंदोलन अटळ आहे, असे परिचारिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सेंट जॉर्ज, जीटी आणि जे. जे. रुग्णालयातील जवळपास हजारांहून अधिक परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज जे. जे. रुग्णालयातील ७६५ परिचारिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. फक्त २१ परिचारिका कामावर रुजू होत्या. त्यामुळे रुग्णसेवेचा भार वरिष्ठ डॉक्टर आणि शिकाऊ विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आला आहे. मात्र, परिचारिकांच्या आंदोलनाचा परिणाम रुग्णालय प्रशासनावर होणार नाही, याची आधीच गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही, असे जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

कंत्राटी पद्धतीने होणारी भरती आणि प्रशासकीय बदली पद्धतीत बदल व्हावा. परिचारिका रुग्णसेवा आणि कुटुंब अशा दोन्ही भूमिका निभावतात. त्यामुळे त्यात त्यांची परवड होते. त्यामुळे या निर्णयातून आम्हाला वगळण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी परिचारिका संपावर गेल्या आहेत.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, की पर्यायी व्यवस्था म्हणून शिकाऊ विद्यार्थी देण्यात आले आहेत. सध्या १० परिचारिका कार्यरत आहेत. आमच्याकडे सध्या १५ नॉन-कोविड रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णांचा भार जास्त नाही. इंटर्न्स, डॉक्टर आणि शिकाऊ परिचारिकांमुळे कामे वाटून दिली गेली आहेत.

प्रशासकीय बदली न करण्याचे आदेश!
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत प्रशासकीय बदलीविषयी निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात प्रत्येक संस्थेला एक पत्रक काढून त्यात परिचारिकांची प्रशासकीय बदली करू नये, असे आदेश दिले जातील. त्यांच्या स्तरावर त्यांनी ही मागणी मान्य केली आहे; परंतु त्याबाबत लेखी आश्वासन दिले गेलेले नाही. परिचारिकांची विनंती बदली करावी, अशा आशयाचे पत्र काढले जाईल, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सर जे. जे. रुग्णालयाच्या अध्यक्षा आरती कुंभारे यांनी सांगितले. डीएमआरच्या संचालकांनी बैठक घेतली; पण त्यात सकारात्मक चर्चा झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.

इलेक्टिव्ह शस्त्रक्रिया लांबणीवर
जे. जे. रुग्णालयात दररोज सुमारे ७० ते ७५ शस्त्रक्रिया करण्यात येतात. मात्र, गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत २६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे इलेक्टिव्ह म्हणजेच काही ठराविक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याखेरीज, आपत्कालीन शस्त्रक्रिया मात्र त्वरित केल्या जात आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालय नुकतेच नॉन कोविड करण्यात आल्याने या रुग्णालयांवर शस्त्रक्रियांचा तितकासा ताण नाही, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83680 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top