बीएसयुपी घरांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसयुपी घरांची दुरवस्था
बीएसयुपी घरांची दुरवस्था

बीएसयुपी घरांची दुरवस्था

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः बीएसयूपी प्रकल्पातील घरांचा आर्थिक गुंता सुटला असून लाभार्थ्यांना लवकरच मोफत हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु प्रकल्पातील घरांना आत्ताच उतरती कळा लागली आहे. इमारतींची अर्धवट कामे, बांधून रिकाम्या पडलेल्या इमारती, इमारतींची झालेली पडझड यासोबतच इमारतीतील अनेक सामानांची झालेली चोरी अशा परिस्थितीतील घरांचा आसरा कोण घेणार, हा प्रश्नच आहे. पालिका प्रशासन इमारत देखभाल दुरुस्तीचे टेंडर काढून त्याची डागडुजी करून नंतर या घरांचे वितरण करेल. यामध्ये किती कालावधी लागेल माहीत नसल्याने बाधितांना घरांची प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून २००७ साली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बीएसयूपी योजना राबविण्यात आली. ७ हजार २७२ घरांचे उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आले होते. बीएसयूपी योजनेतील घरे बांधून पूर्ण असूनही तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. केडीएमसीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने केंद्र व राज्य सरकारला अदा करावा लागणारा आर्थिक निधी पालिकेकडे नव्हता. त्यातच केंद्र सरकारने पालिकेचा हिस्सा माफ केल्यानंतर राज्य शासनानेही हा हिस्सा माफ करावा, अशी मागणी होती; परंतु गेली अनेक वर्षे ही मागणी धूळखात पडली होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या घरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी शिवसेना तसेच महाविकास आघाडी पक्षातील नगरसेवकांनीही हा घरांचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून उचलून धरला गेला. नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेकडून राज्य शासनाला द्यावे लागणारे पैसे माफ करावेत, असे निर्देश दिले आणि या घरांचा मार्ग मोकळा झाला. कचोरे येथील काही इमारतीत नागरिक रहावयास आले आहेत; तर काही इमारतींचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या रिकाम्या पडलेल्या आहेत.
-------
चौकट
* कचोरे, खंबाळपाडा, पाथर्ली गावठाण, बारावे, उंबार्डे, दत्तनगर, सावरकर नगर आदी ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांतर्गत इमारती
* ७ हजार २७२ घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा.
* १ हजार ९९५ लाभार्थ्यांना आत्तापर्यंत घरांचे वाटप करण्यात आले आहे.
* नागरिकांना लगेच राहण्यायोग्य केवळ ९०८ घरे आहेत.
* रेल्वेने पालिका प्रशासनाकडे बीएसयूपीतील ३ हजार घरांची मागणी केली होती; परंतु प्रत्यक्षात ५५ घरेच त्यांनी आत्तापर्यंत घेतली आहेत. यास नगरसेवकांनी त्या काळी कडाडून विरोध केला होता.
---------
बीएसयूपीअंतर्गत ७ हजार २७२ घरांचे उद्दिष्ट होते. ही बांधकामे बांधून पूर्ण झाली आहेत; परंतु देण्यासारखी हजार घरे सध्या आहेत. बारावे, उंबर्डे येथील काही कामे अडलेली आहेत, येथे जवळपास साडेपाच हजार घरे आहेत. बांधकाम पूर्ण होऊनही घरे बंद राहिल्याने त्यांची पडझड झाली आहे; तर काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल.
- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त, केडीएमसी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83708 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top