
दरड कोसळून मृत्यू झाल्यास सत्ताधारी जबाबदार ः आप
मुंबई, ता. २७ : मुंबईतील अनेक डोंगराळ भागातील नागरिकांवर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे सावट असते. तरीही मुंबई महापालिकेकडून दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून (आप) करण्यात आला. येत्या पावसाळ्यात दरड कोसळून मृत्यू झाल्यास त्यासाठी शिवसेनेवर, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’ने केली.
सन २०२१ मध्ये माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ३२७ दरडप्रवण क्षेत्र असून २२,४८३ कुटुंबांवर दरड कोसळण्याचा धोका असतो; मात्र महापालिका केवळ २९१ दरडप्रवण क्षेत्रे असल्याचा दावा करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पूरप्रवण क्षेत्रांना सुरक्षित करण्यासाठी ६१.४८ कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु दुर्दैवाने या लोकांच्या सुरक्षेसाठी काहीही झाले नाही. गेल्या काही दिवसांत ‘आप’ने मुंबईतील काही दरडप्रवण क्षेत्रांना भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आले. भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात. सत्ताधारी केवळ निधी वाटपाचे श्रेय घेतात, मग आपत्तीची जबाबदारीही त्यांनी घ्यावी, अशीही मागणी ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83778 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..