
कोकम फळावर निसर्ग रूसला!
अभय आपटे, रेवदंडा
अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या चौल-रेवदंडामध्ये अनेक वर्षांपासून नारळी-पोफळींच्या बागेत आंतरपीक म्हणून बहुगुणी कोकम वृक्षाची लागवड केली जात होती. दोन वर्षांपूर्वी निसर्ग आणि गतवर्षी तौक्ते चक्रीवादळात अनेक कोकमाची झाडे उन्मळून गेली. त्यातच कोरोनामुळे फळांची विक्री करण्यासाठी बाजारपेठाही बंद होत्या. त्यामुळे हे पीक घटल्याचे लक्षात आले नाही. यावर्षी मात्र कोकम फळांचा हंगाम सुरू होताच बागायतदारांना पीक घटल्याची जाणीव झाली. अमृत सरबत म्हणून नावाजलेल्या या फळावर निसर्ग रूसला असल्याची भावना बागायतदारांमध्ये आहे.
-----------------
गार्सिनिया-इंडिका या फुलातील सुंदर लालसर फळाचे सरबत म्हणजे लोकप्रिय अमृत सर्वांना परिचित आहे. चांगले फळ देणारे पीक असल्याने तळ कोकणापर्यंत याची लागवड आहे. साधारण एप्रिलच्या मध्यात पक्की झालेली फळे बाजारात येतात. या ताज्या फळाचे पर्यटक आणि चाकरमानी हे मुख्य ग्राहक आहेत. शेकडा १५० ते २०० रुपये भाव फळाच्या आकारमानानुसार आहे. कोकणात हे पीक एके काळी विपुल येत होते; पण वातावरणातील बदल, विविध प्रकारची घोंघावणारी चक्रीवादळे आणि माकडांनी वृक्षावर केलेला कब्जा याचा परिणाम उत्पादनांवर झाला.
कोकम पीक घटले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे चक्रीवादळात कोकम वृक्ष मोठ्या संख्येने नष्ट झाले. नवीन लागवड आता बागायतदारांनी केली असली, तरी काही वर्षे त्याला जाणार असल्याने उत्पादन घटले आहे, अशी खंत विठोबा आळी-रेवदंडामधील कृतिशील बागायतदार राजेश मुकादम (४५) यांनी व्यक्त केली. मुकादम यांनी गतवर्षी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमधून कलमे आणली होती. या कलमांची व्यवस्थित देखभाल केल्यास चौथ्या वर्षी उत्पन्न मिळते. शिवाय, झाडांची दरवर्षी छाटणी केल्यास पाडेकरी उपलब्ध नसतानाही फळे बागायतदार काढू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
----------------
बहुगुणी रस
कोकम फळांचा रस पित्तशामक आहे. त्याच्या सालांचे अमसूल बनवले जाते. शर्करायुक्त रस सुमारे १५० रुपयांनी विकला जातो. तर शर्कराविरहित रस म्हणजे ''आगळ'' हे विविध प्रकारच्या भाज्या बनवताना वापर करतात. मुख्यत्वे सोलकढी बनवण्यासाठीही वापर केला जातो.
तेलापासून परकीय चलन
कोकम फळाच्या बियांच्या मगापासून तेल काढले जाते. या तेलाला सर्वांधिक भाव असून ते सौंदर्य प्रसाधनात वापरतात. औषधी मलमे बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. कोकम तेलामुळे परकीय चलन देशाला मिळते. मासे तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.
आमसूलाचा नवीन प्रयोग
चौल-चंपावती आळीतील निसर्गमित्र शैलेश राईलकर यांनी कोकम फळांपासून कोकम चुरा बनवण्याचा नवीन उपक्रम राबवला आहे. कोकम-आमसूलाचा नवीन प्रयोग राईलकर यांनी चौलमध्ये केला आहे. तळ कोकणात कोकम सालाला कोकमच्या रसात सात वेळा बुडवून उन्हात वाळवली जातात. याला (सात पुटे) देणे असेही म्हणतात. त्याऐवजी त्यांनी कोकमाची साले नुसत्या उन्हामध्ये तीन वेळा वाळवून चांगल्या पद्धतीची कोरडी आमसूले तयार केली आहेत. त्यासाठी घरगुती स्पेशल चाळण बनवली आहे. यात मजुरी व वेळ वाचतो, असे लक्षात आले. याचे पॅकिंगसुध्दा आकर्षक करता येते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83804 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..