
रानफळांचा गोडवा
अजित शेडगे, माणगाव
उन्हाळा म्हणजे रानफळांची मेजवानी घेऊन येणारा ऋतू असतो. इतर कोणत्याच ऋतूत न मिळणारी फळे, फुले खास या ऋतूत मिळतात. यामध्ये जांभळे, करवंदे, आठुरणी, कोकम इत्यादी फळांचा समावेश असतो. उन्हाळी दिवसांत तयार होणारी ही फळे म्हणजे खवय्यांसाठी सुखद असा गोडवा असतो.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर आंबा, काजू इत्यादी फळांवरोबर सर्वसामान्यांच्या आवडीची असलेली खास अशा गोडव्याची फळे म्हणजे जांभळे आणि करवंदे होत. रानाची मैना म्हणून करवंदांचा उल्लेख केला जातो. कोकणातील डोंगररांगात दिसणाऱ्या लहान-मोठ्या विस्तीर्ण भागात करवंदाच्या जाळी म्हणजेच विविध पशुपक्ष्यांसाठी निवारा. आंबट-गोड चवीला लागणारी करवंदे उन्हाळ्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या करवंदे १० ते २० रुपये वाटा विकला जातो. पळसाच्या पानात करवंदाची विक्री केली जाते.
करवंदाप्रमाणे डोंगररांगात जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जांभळाचे आयुर्वेदात असंख्य उपयोग सांगितले आहेत. जांभळे मधुमेहींसाठी खास औषधी म्हणून आहेत. हाडकी, मांसवाली, मनुकांच्या आकाराची, तर काही टपोरी असणारी जांभळे खवय्यांसाठी पर्वणी असते. उन्हाळी दिवसात तयार होणाऱ्या या जांभळांना चांगली मागणी असून १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे ती विकली जातात.
करवंदे, जांभूळबरोबरच लालचुटुक रंगांनी मनवेधून घेणारी कोकमाची फळे ही या ऋतूमध्ये तयार होतात. आयुर्वेदातही या फळांचे अनेक उपयोग, गुणधर्म सांगितले आहेत. ५० ते ६० रुपये किलोप्रमाणे ही फळे विकली जातात. आठूरणी, मंदुकली इत्यादी लहान-मोठी फळेही खवय्यांसाठी पर्वणी असते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या रानमेव्याला चांगली मागणी असते. सुवासिनी वाणात आवर्जून या रानफळांनी वाण सजवतात. रानफळांचा हा हंगाम खास वटपौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. त्यानंतर मात्र रानफळांचा हंगाम निघून जातो.
रानफळांचे दर
करवंदे ... १० ते २० रुपये (वाटा)
जांभूळ ... १५० ते २०० रुपये (किलो)
कोकम ... ५० ते ६० रुपये (किलो)
रानफळांना विशिष्ट गोडवा असतो. हा गोडवा खास उन्हाळी दिवसात चाखायला मिळतो. ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळतो. तर गृहिणी रानमेव्यातून विविध पदार्थ तयार करतात.
- दर्शना मोंडे, गृहिणी
बहुपयोगी करंवदे
सुगरणी चविष्ट चटण्या, लोणचीही करतात. करवंदांच्या उपयोग टोपल्या, सुपांना लेप देण्यासाठी म्हणून करतात. पिकलेली करवंदे वाळवून पुढील दिवसांसाठी खाण्यासाठी ठेवली जातात. सुकलेल्या या करवंदांचा स्वाद व चव अगदी वेगळाच स्वादिष्ट असतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83810 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..