
सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक
मानखुर्द, ता. २८ (बातमीदार) : कुर्ला पश्चिम येथील ख्रिश्चन गावातील घरफोडीच्या गुन्ह्यात अभिनव गुप्ता या तरुणाला विनोबा भावेनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी घरफोडी करण्यासाठी वापरलेली हत्यारे, दीड किलो चांदी, १४ मोबाईल फोन, विदेशी चलन तसेच, २ लॅपटॉप व बनावट दागिने जप्त केले आहेत. विनोबा भावे नगर परिसरातील चार गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग चौकशीतून निष्पन्न झाला आहे.
ख्रिश्चन गावात मागील आठवड्यात एक घरफोडीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्यात चोरट्यांनी २५ तोळे सोने तसेच दीड किलो चांदीचे दागिने चोरले होते. विनोबा भावेनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे चार वेगवेगळ्या पथकात विभाजन करून तपासाला सुरुवात केली होती. त्या पथकांनी विनोबा भावेनगर, कुर्ला, टिळकनगर, वाकोला, नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून महत्त्वाची माहिती पथकाच्या हाती लागली व अभिनव गुप्ता या आरोपीची ओळख पटवण्यात यश आले. त्या माहितीच्या आधारे नेहरूनगर, वाकोला व दिवा परिसरात त्याचा शोध पथकाने घेतला. तो कुर्ला पश्चिम येथील किरोल रोड परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याकडून मिळाली. त्या ठिकाणी पथकाने लावलेल्या सापळ्यात अभिनव अलगद अडकला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83848 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..