आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई ‘सज्ज’, धोक्याचा इशारा आता मोबाईलवर | Mumbai Monsoon 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai
आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई ‘सज्ज’

आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई ‘सज्ज’, धोक्याचा इशारा आता मोबाईलवर

Mumbai Monsoon 2022 Preparation

मुंबई, ता. २९ : मान्सूनचे केरळात आगमन झाल्याने पुढील आठवडाभराच्या कावलावधीत तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या स्वागतासाठी मुंबईकरही सज्ज झाले आहेत; परंतु पावसाळा म्हटला की दुर्घटनांमुळे मुंबईकरांच्या मनात थोडी धडकी भरते. अनेकदा आपत्कालीन परिस्थिती ओढवते. यंदा आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला जात आहे. नालेसफाईसह रस्त्यांची कामे झटपट उरकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण बलासह सैन्य दलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाची ही तयारी प्रत्यक्ष संकटकाळात मुंबईला कशी तारणार, याचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.

पाण्याच्या निचऱ्यासाठी ४५०पंप
मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळित होते. रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूकही विस्कळित होते. त्यामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सबवे या पाणी तुंबणाऱ्या अन्य ठिकाणीही पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत इतरही अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना नाकारता येत नाही. अशा ठिकाणांचा अभ्यास करून मुंबईतील विविध भागांमध्ये रेल्वे, एमएमआरडीएसह एमएमआरसी व पालिकेच्या वतीने सुमारे ४५० पंप बसवण्यात आले आहेत. हिंदमाता, किंग्ज सर्कल, शिवडी, काळाचौकी, कुर्ला, घाटकोपर यांसह अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या तक्रारी येत असतात. अधिक पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मॅनहोल उघडून सुरक्षेसाठी कर्मचारी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मुंबई येणार पुण्याच्या आणखी जवळ, प्रवाश्यांची २५ मिनीटं वाचणार

सैन्यदलाच्या मदतीने पावसाशी लढाई
मुंबईत कितीही नालेसफाई केली किंवा यंत्रणा राबवल्या, तरी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबणारच, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह आता भारतीय सैन्यदलाच्या ५०० जवानांची फौज तैनात ठेवण्यात येणार आहेत.

चेंबूर, गोवंडी, भांडुपमध्ये अतिरिक्त तुकड्या
१) मुंबईत अतिवृष्टी झाल्यास चेंबूर, गोवंडी, भांडुप आदी भागात दरडी कोसळणे, इमारत दुर्घटना घडतात. आधीच्या दुर्घटनांचा अनुभव पाहता अशा दुर्घटनांमध्ये बचाव-मदतकार्यासाठी अग्निशमन दल, पोलिस दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्यासह यंदा पावसाळ्यामध्ये प्रथमच लष्करी तुकड्यांचीही सज्जता ठेवण्यात येणार आहे.
२) आपत्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास ५०० लष्करी जवानांचे सहाय्य उपलब्ध होईल, अशी तयारी मुंबई महापालिकेने केली आहे. यंदा एनडीआरएफच्या तुकड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. दरड कोसळण्याची भीती असणाऱ्या भांडुप, चेंबूर, गोवंडी विभागांमध्ये या तुकड्या स्वतंत्रपणे तैनात केल्या जाणार आहेत.

दोन लाख व्यक्तींसाठी तात्पुरता निवारा
गेल्या वर्षी पावसाळ्यातील अनुभव पाहता आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या रहिवाशांच्या निवाऱ्याची सोय करावी लागते. या वर्षीही तशीच परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन प्रसंगात अडकलेल्या रहिवाशांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था व्हावी, यासाठी पालिकेच्या शाळांसह, समाजकल्याण केंद्र, अन्य जागा उपयोगात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सुमारे दोन लाख रहिवाशांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'मी सर्व काही गमावलंय; त्रिपाठी कुटुंबाला दोनच दिवसांपूर्वी मी मुंबई विमानतळावर सोडलं'

धोक्याचा इशारा आता मोबाईलवर
१) एखाद्या भागात पावसाळ्यात तुंबलेले पाणी, दरड कोसळण्याच्या घटना, वाहतूक कोंडी यासह विविध प्रकारच्या धोक्याचा इशारा मुंबईकरांना आता घरबसल्या किंवा प्रवासात असतानाच मोबाईलवर मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीची माहिती देणारे ॲप आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
२) महापालिकेने आधीच सुरू केलेल्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ अ‍ॅप अपडेट करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून पावसाळ्यात दरड कोसळणे, इमारती पडणे, विविध भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे, भरती-ओहोटीची माहिती, वाहतूक कोंडी याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलिस ठाणे तसेच पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक ॲपवर असणार आहेत. यावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणाशी लगेचच संपर्क साधणे शक्य होणार आहे.

चौपाट्यांवर लाईफ गार्डची सुरक्षा (Mumbai High tide alert 2022)
१) यंदाच्या वर्षी २२ दिवस समुद्राला मोठी भरती आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ९३ लाईफ गार्डची नेमणूक केली आहे. पावसाच्या तोंडावर मुंबईतील चौपाट्यांवर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये हे लाईफ गार्ड बचावकार्यासाठीच्या साधनसामग्रीसह तैनात राहणार आहेत.
२) मरिन ड्राईव्हसह गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई या चौपाट्यांवर पर्यटक गर्दी करतात. काही अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. समुद्रात ४ ते ५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याच्या दिवशी पालिकेकडून धोक्याचा इशारा दिला जातो. शिवाय सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून ९३ लाईफ गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत.
३) लाइफ गार्डला बॅकअप देण्यासाठी अग्निशमन दलाची फ्लड रिस्पॉन्स टीमही तैनात असेल. शिवाय गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, कुर्ला फायर स्टेशन, मालाड फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन, गोराई फायर स्टेशनवर पथक देखील तैनात असणार आहेत.

नालेसफाई निरंतर सुरू राहणार
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली. यंदाच्या वर्षीचे नालेसफाईचे टार्गेट पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण दोन लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या कामांना उशिरा सुरुवात करण्यात आली असली, तरी निर्धारित वेळेत नालेसफाईची कामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पावसाळ्यात निरंतर नालेसफाई सुरूच राहणार आहे.
मुंबईत दर वर्षी मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो; तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. यंदाच्या या कामांचा विचार करता, मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किमतीच्या १७ निविदा मंजूर करण्यात आल्या. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६; तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ निविदा आहेत. म्हणजेच, मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे २०० कोटींची कामे हाती घेण्यात आली.

व्हिडीओ क्लिप बंधनकारक
गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने पालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त सूचनांचा समावेश केला. प्रत्येक २०० मीटर अंतराच्या कामासाठी किमान ५ मिनिटे कालावधीची दृकश्राव्य चित्रफीत (व्हिडीओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले.

मोठ्या नाल्यांच्या सफाईवर भर
गाळ काढण्याच्या सुरू झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने एन विभागातील लक्ष्मीबाग नाला, एस विभागातील उषानगर नाला, टी विभागातील नीलमनगर नाला, एम/पूर्व विभागातील पीएमजीपी नाला, एम/पश्चिम विभागातील वाशी नाका नाला, एल विभागातील सफेद पूल नाला, के/पश्चिम विभागातील विमानतळ नाला, के/पूर्व विभागातील लेलेवाडी नाला, पी/दक्षिण विभागातील वालभट नाला, पी/उत्तर विभागातील रामचंद्र नगर नाला, एच/पश्चिम विभागातील बोरान नाला ही कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. तसेच आर/दक्षिण विभागात लालजीपाड्याजवळ पोईसर नदी, आर/उत्तर विभागात संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याजवळ दहिसर नदी, आशीष संकुलाजवळील एन. एन. कंपनी नाला या ठिकाणीची कामेदेखील हाती घेण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83918 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsMonsoonBMC
go to top