
ठाण्यातील पुनमिया कुटुंबावर काळाचा घाला
ठाणे, ता. २९ ः सिक्कीममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील पाच जणांचा मोटार अपघातात मृत्यू झाला असून मृतांपैकी चौघे एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्यातील पुनमिया कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. दरीत कार कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात पुनमिया कुटुंबातील चार जण ठार झाले. त्यांच्याच गाडीत असलेल्या ठाण्यातील अन्य एका पर्यटकासह चालकाचाही अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री घडला. रविवारी लष्कराने शोध घेतल्यानंतर तो उघडकीस आला.
सुरेश पन्नालालजी पुनमिया (४०), तोरल सुरेश पुनमिया (३०), हिरल सुरेश पुनमिया (१४), देवांशी सुरेश पुनमिया (१०) आणि जयन अमित परमार अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील सुमारे १८ जणांचा समूह सिक्कीममध्ये पर्यटनासाठी गेला होता. त्यात पुनमिया कुटुंबीयांचाही समावेश होता. शनिवारी रात्री ते मोटारीने हॉटेलकडे परतत असताना नॉर्थ सिक्कीममध्ये खेडुंगजवळ मोटार दरीत कोसळली. पुनमिया यांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त जयन परमार आणि चालकाचाही अपघातात मृत्यू झाला. जयन हा सुरेश यांच्या मित्राचा मुलगा होता. हिरल आणि देवांशी यांना सोबत करण्यासाठी तो अपघातग्रस्त मोटारीत बसला होता. त्याचे आई-वडील दुसऱ्या गाडीत होते.
लष्कराची मदत
पर्यटनानंतर रात्री दोन गाड्या हॉटेलमध्ये परतल्या; परंतु सुरेश पुनमिया यांची मोटार न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने लष्काराला माहिती देण्यात आली. त्यानंतर लष्काराच्या जवनांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्यानंतर रविवारी सकाळी अपघाताचा प्रकार उघडकीस आला. सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे. मृत वाहनचालक स्थानिक नागरिक होता.
आज मृतदेह ठाण्यात
सोमवारी (ता. ३०) सकाळी विमानाने सर्व पाच जणांचे मृतदेह ठाण्यात आणण्यात येणार आहेत. सुरेश पुनमिया सोन्याचे व्यापारी असून ते टेंभी नाक्याजवळील ‘ओशो महावीर’ इमारतीत राहत होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84030 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..