
मुंबईत मॅनहोल उघडेच!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत मुसळधार पावसामध्ये उघडे मॅनहोल्स हे अक्षरशः मृत्यूचा सापळा बनतात. दरवर्षी नागरिकांना या मॅनहोल्सच्या धोक्याचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये आतापर्यंत अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. अतिवृष्टीत पाणी तुंबल्यामुळे उघडे ठेवण्यात येणारे मॅनहोल्स अत्यंत धोकादायक ठरतात. दरम्यान, मुंबईत १०० हून अधिक ठिकाणी हे मॅनहोल्स अद्यापही उघडेच असल्याचे समोर आले आहे. आम आदमी पक्षाने आज मुंबईत केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव समोर आले आहे. निष्काळजीपणा जीवघेणा सिद्ध झाल्यावरच पालिका कारवाई करणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरात ठिकठिकाणी उघडे असलेले मॅनहोल्स लवकरात लवकर बंद करून मुंबईकरांचे प्राण वाचावे, या उद्देशाने ‘आप''च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शहराच्या विविध ठिकाणी सर्वेक्षण केले. यात शहरातील नऊ प्रभागांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी मोठ-मोठे मॅनहोल्स बंदच केले नसल्याचे समोर आले. अनेक मॅनहोल्सच्या आजूबाजूला खबरदारीच्या सूचना देणारे फलकही लावले नाहीत, ज्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा अत्यंत जवळ येऊन ठेपला तरी अजूनपर्यंत मॅनहोल्स उघडे असल्याबबत चिंता व्यक्त करत, पालिकेने आठवडाभरात सर्व उघडे मॅनहोल दुरुस्त करून झाकावेत आणि त्याची प्रत्यक्ष माहिती देण्यात यावी, अशी मागणी ‘आप''ने केली आहे.
पालिका उघडे मॅनहोल दुरुस्त करत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. दरवर्षी किमान एक मुंबईकर आपले प्राण यामुळे गमावतो. आम आदमी पक्षाला शहरभर इतके उघडे मॅनहोल सापडू शकतात तर पालिकेला ते शोधून काढण्यात काय अडचण आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच पालिका कारवाई करणार का?
- रुबेन मस्करेन्हास, कार्याध्यक्ष, आम आदमी पक्ष
३२८ जणांनी गमावला जीव
१) मॅनहोलमध्ये पडून गेल्या पाच वर्षांमध्ये ३२८ मुंबईकरांनी जीव गमावला आहे. मॅनहोलमध्ये पडून हे मृत्यू झाले आहेत. यामध्ये २३७ पुरुषांचा आणि ९१ महिलांचा समावेश आहे, तर १६७ जणांना पावसाळ्यात जखमा झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये १२२ पुरुष आणि ४५ महिलांची संख्या आहे.
गेल्या पाच वर्षांत २०१७ मध्ये सर्वाधिक असे मृत्यू झाले. त्यामध्ये ७८ जणांना जीव गमवावे लागले.
२) मॅनहोलमध्ये पडण्याच्या एकूण ६३९ घटना घडल्या. पालिकेकडेही याबाबत १५४ तक्रारी आल्या होत्या. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान. २०१७ च्या पावसाळ्यात बॉम्बे रुग्णालयाचे प्रसिद्ध पोट विकारतज्ज्ञ डॉ. दीपक आमरापूरकर यांचाही मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यांचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84137 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..