
मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची आज सोडत मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची आज सोडत
मुंबई, ता. ३० : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (ता. ३१) पार पडणार आहे. यंदाच्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीकडे सगळ्या नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. सोडतीमध्ये महिला आणि अनुसूचित जाती-जमातीसाठीचे आरक्षण स्पष्ट होईल. दोन वेळा आरक्षित प्रभागांत बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागामध्ये आरक्षण कसे बदलते, त्यावर सगळी गणिते ठरणार आहेत.
आरक्षणाच्या सोडतीवर ६ जूनपर्यंत सूचना-हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांसह आजी-माजी नगरसेवकांमध्ये आरक्षणाच्या सोडतीवरून धाकधूक आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून आरक्षणाची सोडत पार पडणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पार पडेल.
यंदा मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी २३६ नगरसेवक प्रतिनिधींची संख्या राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केली आहे. त्यानुसार ३१ मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी सूचना-हरकत २४ प्रभागांमध्ये नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल. या आधी दोन वेळा आरक्षण नव्हते अशा ठिकाणी ते अपेक्षित आहे. त्यामुळे अशा प्रभागांमध्येही इच्छुक आणि आजी नगरसेवकही लक्ष ठेवून आहेत. अनेकांना आपल्या प्रभागात केलेल्या कामाच्या आधारावरच यंदाही मनासारखा प्रभाग मिळावा, अशी अपेक्षा आहे.
सोडतीची वैशिष्ट्ये
- महिलांसाठी ११८ प्रभागांमध्ये आरक्षण
- अनुसूचित जातींसाठीचे प्रभाग १५. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ८ प्रभाग
- अनुसूचित जमातीसाठीचे प्रभाग २. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी प्रभाग १
- खुला वर्ग महिलांसाठी ः १०९
- ३१ मे रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांना ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत
- पालिकेच्या २४ प्रभागांमध्ये २५ ठिकाणी हरकती-सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
- १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84156 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..