
मॅकनिकच निघाला चोर
डोंबिवली, ता. ३१ ः मित्रांबरोबर मजामस्ती करण्यासाठी महागड्या बुलेट गाड्या तो चोरायचा. चोरीच्या गाडीचे हँडल लॉक तोडून घरापर्यंत गाडी ढकलत आणायचा. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना संशय येऊ नये म्हणून तो माझी गाडी खराब झाली आहे, त्याला थोडा धक्का मारा असे लोकांना सांगत त्यांची मदत घेत असे. तो स्वतः मेकॅनिक असल्याने तो नंतर त्या गाडीचे लॉक नवीन टाकायचा किंवा चावी बनवून वापरायचा. त्याची ही शिताफी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि रामनगर पोलिसांच्या तावडीत तो सापडला. राज तावडे (वय २५) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पाच ते सात मोटरसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून रामनगर पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असता एक चोरटा सीसीटीव्हीमध्ये आढळून आला. त्यादृष्टीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, पोलिस नाईक प्रशांत सरनाईक यांच्या पथकाने गुप्त बतमीदारामार्फत चोराची माहिती काढली. २७ मे रोजी सायंकाळी संशयित राज हा पोलिसांना आयरेगाव परिसरात एका बुलेटवर सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीचा शोध घेतला असता ती चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास केला असता एक लाख ८० हजार रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकल त्याने चोरी केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या गाड्या हस्तगत केल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84177 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..